केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे प्रशासनिक सेवेसाठी होणारी मुख्य परीक्षा व रेल्वे निवड मंडळातर्फे होणारी अभियंता सेवा परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने या दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसमोर पेच उभा ठाकला आहे. यातील किमान रेल्वे मंडळाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.  लोकसेवा आयोगातर्फे प्रशासनिक सेवेसाठी घेतली जाणारी मुख्य परीक्षा येत्या १४ डिसेंबरपासून सुरूहोत आहे. ही परीक्षा २० डिसेंबपर्यंत चालणार आहे. रेल्वे निवड मंडळातर्फे जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार कनिष्ठ अभियंता पदासाठी घेतली जाणारी परीक्षा १४ डिसेंबरला होणार आहे, तर वरिष्ठ शाखा अभियंता पदासाठी २१ डिसेंबरला लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी १४ डिसेंबरला दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.