देशातल्या पूर्वप्राथमिक शाळांमध्ये दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम केलेल्या शिक्षकांनाच काम करता येणार आहे. त्यामुळे नर्सरी शाळांमध्ये आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची दुकानदारी आता बंद होणार आहे. त्याचप्रमाणे देशातील शिक्षणशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमांमध्येही राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने बदल केले असून आता बीएड, बीपीएडचे अभ्यासक्रम दोन वर्षांचे होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षांपासून नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे.
पूर्वप्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आता दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अगदी ३ महिन्यांपासून ते एक वर्षांच्या कालावधीपर्यंत वेगवेगळ्या नावाने चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांना आळा बसणार आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षणशास्त्रातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये बदल केला आहे. त्याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारच शिक्षक म्हणून काम करू शकणार आहेत. हा पदविका अभ्यासक्रम आता दोन वर्षांचा करण्यात आला आहे. बारावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. अभ्यासक्रमांत शाळेतील प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचाही समावेश करण्यात आला आहे. दोन वर्षांमध्ये २० आठवडे प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे असणार आहेत.
शिक्षणशास्त्रातील आणि शारीरिक शिक्षण शास्त्रातील पदवी अभ्यासक्रमांमध्येही परिषदेने बदल केले आहेत. बीएड, बीपीएडचे अभ्यासक्रम आता दोन वर्षांचे होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठीही इन्टर्नशिप बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे योगा, जेंडर स्टडीज, माहिती-तंत्रज्ञान, विशेष मुलांसाठीचे प्रशिक्षण अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. बीए किंवा बीएससी आणि बीएडच्या एकत्रित अभ्यासक्रमांनाही (इंटिग्रेटेड) परिषदेने मान्यता दिली आहे.
 बीए. बीएड किंवा बीएससी बीएड चा अभ्यासक्रम बारावीनंतर ४ वर्षांचा करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच बारावीनंतर चार वर्षांत शिक्षणशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचाही मार्ग विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अर्धवेळ बीएड अभ्यासक्रम आता तीन वर्षांचा होणार आहे. बीएड आणि एमएडच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाचाही पर्याय आहे.

महाविद्यालये अडचणीत
शिक्षणशास्त्रातील आणि शारीरिक शिक्षण शास्त्रातील पदवी अभ्यासक्रमांमध्येही परिषदेने बदल केले आहेत. बीएड, बीपीएडचे अभ्यासक्रम आता दोन वर्षांचे होणार आहेत. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना मुळातच विद्यार्थी शोधावे लागत आहेत. त्यातच अभ्यासक्रमाचे एक वर्ष वाढल्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणखी कमी होण्याची चिंता महाविद्यालयांतून व्यक्त होत आहे. एकाच इमारतीत दोन, तीन अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांचे या बदलांमुळे आता धाबे दणाणले आहेत.