विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लांबणे, निकालातील चुका, विद्यार्थ्यांसाठी सुविधांचा अभाव, शिष्यवृत्तीचा परतावा न मिळणे.. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या नेहमीच्या अडचणी. मात्र, आता विद्यार्थ्यांना अशा अडचणी थेट विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मांडता येणार असून त्यासाठी आयोगाने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे.
विद्यापीठे किंवा महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. मात्र, त्यावर दाद कुठे मागायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. यासाठी आयोगाने विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून त्याचे स्वतंत्र संकेतस्थळही तयार केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थी आपली तक्रार नोंदवू शकतात. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या स्तरावर एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना आयोगाने दिली आहे. विद्यार्थ्यांने या संकेतस्थळावर तक्रार नोंदवल्यावर ती संबंधित विद्यापीठाच्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल.
 त्या तक्रारीबाबत उत्तर देण्यासाठी विद्यापीठाला पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांला आपण केलेल्या तक्रारीची सद्य:स्थिती काय आहे, विद्यापीठाने काय उत्तर दिले हे पाहता येणार आहे. या संकेतस्थळावर नोंदवलेल्या तक्रारींचे निरसन झाले का, यावर आयोगाकडूनच देखरेख करण्यात येणार आहे.परीक्षा वेळेवर न होणे, निकाल जाहीर होण्यास लागणारा विलंब, निकालात चुका असणे, महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती नाकारण्यात येणे, सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाद होणे, एखाद्या विद्यार्थ्यांचा जाणीवपूर्वक मानसिक छळ करणे, लैंगिक छळ, अशा प्रकारच्या तक्रारी विद्यार्थी या संकेतस्थळावर करू शकणार आहेत. आयोगाच्या ६६६.४ॠू.ूं. ्रल्ल या संकेतस्थळावर या तक्रारी नोंदवता येणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर
आयोगाने नुकतेच हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मात्र, त्याला देशभरातील विद्यार्थ्यांकडून लगेच प्रतिसाद मिळू लागला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत देशभरातील ३७ विद्यापीठांबाबत ६३ तक्रारींची नोंद या संकेतस्थळावर झाली आहे. मात्र, तक्रारींच्या बाबतीतही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे. सर्वाधिक म्हणजे ९ तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.