मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच तरूण संशोधकांना प्रोत्साहन मिळावा यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना पेटंटसाठी येणारा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचेही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी पार पडलेल्या विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळय़ाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी आश्वासनांची खरात केली आहे.
संशोधकांना पेटंटसाठी नोंदणी करावी लागते. यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शुल्क आकारले जाते. देशात पेटंट नोंदणीसाठी लागणारा खर्च तुलनेत कमी असला तरी आंतराष्ट्रीय स्तरावर हा खर्च जास्त असतो. काही विद्यार्थ्यांना हा खर्च परवडणारा नसतो. विद्यापीठातील कायमस्वरूपी पदावर काम करणाऱ्या १३७२ कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणाही वेळूकर यांनी यावेळी केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला ३५० रुपये कापले जातील तर उर्वरित ४३८२ रुपये विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या वतीने भरणार आहे. यासाठी विद्यापीठाने न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीला ६० लाख १२ हजार १५९ रुपयांचा धनादेशही दिला आहे. तर सिंधुदुर्ग येथे दुसरे मॉडेल महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.