शाळा ते घर या दरम्यानचा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व सुनियोजित असावा या करिता नेमून दिलेल्या शाळाबस नियमावलीची अंमलबजावणी मुंबई, ठाणे, रायगडमधील सर्व शाळांमधून होत आहे की नाही याची तपासणी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
शाळाबस सेवा सुरक्षित, सुनियोजित व कार्यक्षम करण्याकरिता राज्य सरकारने शाळाबस धोरण लागू केले आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि रायगड भागातील १५,३३० पैकी सुमारे ५० टक्के शाळांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे, विद्यार्थी-पालकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अनेकदा शाळेची बस वेळेवर येत नाही. कधीकधी येतही नाही. अशा वेळी पालकांना स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवावे लागते. या शिवाय बसगाडीत प्रथमोपचार सुविधा, महिला सहायक, अग्निशमन यंत्रणा आदी संदर्भातील नियमांचेही पालन केले जात नाही. काही शाळा तर बससेवेची जबाबदारी घ्यायलाच तयार नाहीत. शाळाबस नियमावली अंमलात न आल्यानेच वारंवार अनुचित प्रकार घडतात. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा शाळांची चौकशी करण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे उपाध्यक्ष साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
या बसबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शाळेतील मुलांची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेची परिवहन समिती असावी असा नियम आहे. या समितीचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक असतील आणि पालक शिक्षण संघाचे एक प्रतिनिधी, क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, शिक्षण निरीक्षक व बसच्या कंत्राटदारांचा एक प्रतिनिधी समितीत असेल, असे सूचित केले आहे. परंतु, अनेक शाळांनी ही समितीच अद्याप नेमलेली नाही. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन या बाबी निदर्शनास आणून दिल्या. नेमक्या कुठल्या शाळांध्ये स्कूलबस धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही, याची माहिती किंवा आकडेवारीच शालेय शिक्षण विभागाकडे नाही. शाळांची पाहणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दुर्गे यांनी व्यक्त केली.
सर्व शाळांनी नियमावलीची अंमलबजावणी केली आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांना देऊ. या तपासणीत ज्या शाळांनी या धोरणाची अंमलबजावणी केली नसेल, त्यांच्यावर कारवाई करू.
– भीमराव फडतरे,
शिक्षण उपसंचालक.