वटवाघळांच्या त्रासाचे कारण देत बहरलेले १५ वृक्ष रातोरात भुंडे करून टाकण्याचा प्रकार मुंबई विद्यापीठात नवीन नसून गेली अनेक वर्षे कलिना संकुलातील डेरेदार वृक्षांची सरसकट छाटणी करून विद्यापीठाचा परिसर रखरखीत केला जात आहे. या बेसुमार कत्तलीमागे लाकूडचोरीचे मोठे रॅकेट असल्याचा सांगितले जात आहे.
कलिना संकुलात अनेक डेरेदार वृक्ष आहेत. परंतु, या वृक्षांचा हिरवागार पर्णसंभार डोळ्यांत खुपावा या पद्धतीने गेली काही वर्षे त्यांची छाटणी सुरू आहे. कुलगुरू राजन वेळुकर यांनी वृक्षारोपणाला महत्त्व देत या परिसरात आमराई फुलविली. पण, नवी झाडे लावताना जुन्या झाडांची निगा राखणे, त्यांची जोपासना करणे याकडे प्रशासनाचे म्हणावे तसे लक्ष नाही. उलट ही झाडे उघडीबोडकी करण्याची संधीच शोधली जाते. नुकत्याच छाटण्यात आलेल्या १५ वृक्षांच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.
कोणताही शेंडाबुडखा नसलेल्या आदेशाचे कागद नाचवत झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळील अनेक झाडे अशाच पद्धतीने छाटली गेली आहेत. या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या गुलाब उद्यानासाठी म्हणून आजूबाजूचे अनेक वृक्ष छाटण्यात आले. अनेकदा पावसाळ्याआधी फांद्यांची छाटणी करण्याऐवजी ऐन उन्हाळ्यातच वृक्ष ओडकेबोडके केले जातात. मग विद्यापीठाचे कर्मचारी, प्राध्यापकच यात हस्तक्षेप करून ही छाटणी थांबवितात. त्यामुळे होणारा विरोध टाळण्यासाठी अनेकदा रविवारी सुट्टीच्या दिवशी फांद्याची व वृक्षांची छाटणी केली जाते.
विद्यापीठातील काहीजणांना हिरवळीचा फार सोस. ही हिरवळ टिकावी म्हणून सतत पाण्याची फवारणी केली जाते. झाडांना द्यायला मात्र पाणी नसते. त्यामुळे, अनेक लहानमोठी झाडे करपून गेली आहेत, अशी तक्रार एका प्राध्यापकाने केली. या कोरडय़ा धोरणामुळे विद्यापीठाचा हिरवागार परिसर उघडाबोडका होत चालला आहे.

विद्यार्थी तक्रार करणार
वटवाघळांचे कारण देत एकदम १५ झाडांची कत्तल करण्यासारखे प्रकार थांबावेत यासाठी विद्यार्थ्यांनीच कंबर कसली आहे. या प्रकाराची मुंबई महानगरापालिका, वन विभाग यांच्याकडे पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत रितसर तक्रार करण्यात येणार आहे.