अतिरिक्त शुल्क वसुलीप्रकरणी डोंबिवलीच्या के. वि. पेंढरकर महाविद्यालयावर कारवाई करण्याचे संकेत कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी मंगळवारी विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत दिले. या महाविद्यालयाने विद्यापीठाने निश्चित केलेली शुल्करचना धुडकावून विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क वसूल केल्याचा आरोप आहे.
त्याचबरोबर महाविद्यालयाच्या मनमानी कारभारामुळे येथील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीही त्रस्त होते. त्यांच्या तक्रारीनंतर या महाविद्यालयाच्या चौकशीकरिता विद्यापीठाने समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार महाविद्यालयावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वेळूकर यांनी बैठकीत दिले.
पेंढरकर महाविद्यालयावरून अधिसभा सदस्यांनी प्रश्न विचारून कुलगुरूंना भंडावून सोडले. महाविद्यालयाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीतील सदस्यांचा धमकी देण्यात आल्याचे या समितीच्या निमंत्रक आणि अधिसभा सदस्य अनुपमा सावंत यांनी या वेळी सांगितले. तसेच चौकशीकरिता गेलो असताना महाविद्यालयाच्या प्रशासनाने समितीला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. या प्रश्नावर इतरही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत महाविद्यालयाच्या प्रशासनावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.