अमृत महोत्सवी वर्षांची वाटचाल करणारी ‘लोकांची शाळा’ नावापासूनच नावीन्य जपणारी आणि अष्टपैलू उपक्रमांमधून विद्यार्थिनींचा र्सवकष विकास घडवून आणणारी एक समाजाभिमुख शिक्षण संस्था आहे. अभ्यास, खेळ, सामाजिक उपक्रमांपासून ते स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थिनी आज विविध भागांत चांगल्या पदांवर काम करीत आहेत. लोकशिक्षण संस्था संचालित म.पां. देव स्मृती लोकांची माध्यमिक शाळा, लोकांची प्राथमिक व पूर्वमाध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि ‘फुलोरा’ बालक मंदिर यांच्यातर्फे वर्षभर विविधांगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या संस्थेत १८०० च्या वर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेचा क्रीडा विभाग आणि संगीत विभाग हे तर शाळेचे उज्ज्वल भालप्रदेश आहेत. क्रीडा क्षेत्रात वेगवान धावपटू, जलतरणपटू, योगासन, खो-खो, बॉल बॅटमिंटन, कबड्डी इत्यादी खेळांमध्ये शाळेच्या सशक्त, समर्थ खेडाळूंनी राज्य व राष्ट्रस्तरापर्यंत आगेकूच केली आहे. संगीत विभागातर्फे दिवं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, यशवंत देव, पं. जितेंद्र अभिषेकी, उपेंद्र भट, शौनक अभिषेकी यांच्याकडून विद्यार्थिनी आणि पालकांना आपल्या स्वरगंगेत चिंब होण्याची अनुभूती दिली आहे. विद्यार्थिनींवर भाषेचे संस्कार करण्याच्या दृष्टीने मराठी दिन, हिन्दी दिन, संस्कृत दिन साजरे केले जातात. दरवर्षी संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृतच्या विद्यार्थिनी एक नावीन्यपूर्ण संस्कृत विषय चित्रे, मॉडेल्स, तक्ते यांच्या माध्यमातून साकारतात.
‘कमवा आणि शिका’ हा एक अनोखा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे. गरजू, होतकरू विद्यार्थिनींसाठीच एक आत्मनिर्भरतेचा अनोखा उपक्रम राबविताना शालेय उपयोगी वस्तू म्हणजे पेन, पेन्सिल, स्केल इत्यादी वस्तू विद्यार्थिनींसाठी विक्रीस ठेवल्या आहेत. पालकांची परवानगी घेऊन सध्या १२ विद्यार्थिनींचा सहभाग केला आहे. या सर्व गोष्टींचा त्या आनंद घेतात व स्वकमाई करण्याचे समाधान मिळवितात.
शाळेच्या सुसज्ज ग्रंथालयात जवळजवळ ४००० संदर्भ ग्रंथ आहेत. संदर्भ ग्रंथांमध्ये अनेक प्रकारेच ८० शब्दकोश, सुलभ विश्वकोश, संस्कृतीकोश, मराठी ज्ञानकोश, मराठी विश्वकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, प्राचीन महाराष्ट्र, प्राचीन मध्ययुगीन-अर्वाचीन चरित्रकोश, जागतिक शास्त्रज्ञ कोश, असे अनेक प्रकारचे कोषवाङ्मय आहेत. धार्मिक ग्रंथामध्ये रामायण, महाभारतचे सर्व खंड आहेत. वाचन संस्कृतीचा प्रचार हे उद्दिष्ट असल्यामुळे वर्तमानपत्रे शाळेच्या व्हरांडय़ात स्टॅन्डवर वाचण्यासाठी लावलेले असतात.
अशी उपक्रमशील शाळा सद्यस्थितीत लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. वि.स. जोग, सचिव मनोहर ढोक, कोषाध्यक्षा अर्काटकर आणि शाळेच्या प्राचार्य श्रीमती रेखा राठोड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीपुत वाघमारे आणि फुलोरा विभागाच्या प्रमुख श्रीमती दीपाली जोशी यांच्या मार्गदर्शनाखालील वाटचाल करीत आहे. अमृत महोत्सवांतर्गत येणारे स्नेहसंमेलन आगामी ६ जानेवारी ते १५ जानेवारी २०१३ दरम्यान शाळेच्या पटांगणावर होणार असून माजी विद्यार्थिनींचा मेळावा हा माजी विद्यार्थिनीनींच आयोजित केलेला आहे स्मरणिकेचे प्रकाशन मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. यासाठी ९८२३२२००८५ या मोबाइलवर संपर्क साधता येईल.
९४२२१०१८६२
म.पां. देव स्मृती लोकांची शाळा, सिरसपेठ, नागपूर.