चित्ररथांच्या माध्यमातून शिक्षण हक्क कायद्याबाबत जागृती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण समारंभामध्ये हे चित्ररथ दिसणार आहेत.
गेल्या वर्षीपासून शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबाजवणी करण्याचा शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्यातील सर्व तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मार्च २०१३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाकडून प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये शिक्षण हक्क कायद्याबाबत जागृती करणारा चित्ररथ संचलनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्य़ाच्या मुख्य ठिकाणी होणाऱ्या संचलनामध्ये चित्ररथाचा समावेश करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, मुंबई येथे होणाऱ्या मुख्य संचलनासाठी शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथाच्या धर्तीवरच प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये चित्ररथ तयार करायचा आहे. या चित्ररथावर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून करण्यात आलेली २५ टक्के आरक्षणाची तरतूद, शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा कशा असाव्यात अशा विविध मुद्दय़ांवर आधारित देखावे या चित्ररथावर उभारण्यात येणार आहेत.