अभ्यासक्रमांची मुदत बदलल्याने फटका; जागांची संख्या कमी झाल्याने चुरस वाढणार

‘बॅचलर ऑफ एज्युकेशन’ (बीएड) आणि ‘मास्टर ऑफ एज्युकेशन’ (एमएड) या शिक्षणशास्त्र विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मुदत यंदापासून एकाऐवजी दोन वर्षांची केल्याने पाठय़क्रमापासून ते अभ्यासक्रम चालविण्यासाठीच्या पात्रता निकषांपर्यंत अनेक बाबींत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. या बदलांनुसार महाविद्यालयांची मान्यता व संलग्नतेची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत असल्याने सप्टेंबर उजाडला तरी या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. इतकेच नव्हे तर नव्या निकषांनुसार या दोन्ही अभ्यासक्रमांच्या जागांची संख्याही चांगलीच कमी होणार आहे. त्यामुळे, यंदा प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांमध्ये मोठीच चुरस असणार आहे.
नव्या निकषांनुसार बीएड-एमएड महाविद्यालयांना ‘राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद’ (एनसीटीई) या शिखर संस्थेने मान्यता तर दिली आहे. परंतु, विद्यापीठांची संलग्नता प्रक्रिया उशीरा सुरू झाल्याने राज्यातील तब्बल ४७५ बीएड-एमएड महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एरवी मे महिन्यात होणारी बीएड-एमएडची सीईटी दोन महिन्यांच्या विलंबाने म्हणजे २५ जुलैला झाली. ७ ऑगस्टला सीईटीचा निकाल जाहीर करून त्यांच्याकडून जागांसाठी पसंतीक्रम भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, गेले दोन ते तीन वेळा पसंतीक्रम भरण्याला मुदतवाढ देत जागांच्या वाटपाचे काम पुढे ढकलले जात आहे. कारण, कोणत्या महाविद्यालयात नेमक्या किती जागा आहेत तेच अद्याप निश्चित झालेले नाही. महाविद्यालये उशीरा सुरू झाल्यास त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे मत माजी अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी व्यक्त केले.

प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करू -संचालक
महाविद्यालयांना काही अटी व शर्तीच्या आधीन राहून एनसीटीईने मान्यता दिली असली तरी त्यांना त्या त्या विद्यापीठांकडून संलग्नता घेणे बंधनकारक आहे. याच प्रक्रियेला विलंब लागल्याने बीएड-एमएडच्या प्रवेशाची जबाबदारी असलेल्या शिक्षण संचालकांना प्रवेश प्रक्रिया सुरू करता आली नाही. कारण, प्रवेश सुरू करण्यासाठी जागांची संख्या निश्चित लागते. ‘महाविद्यालयांच्या मान्यता व संलग्नतेची कागदपत्रे तपासून जागांची निश्चित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. हे काम संपल्यानंतर १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पहिली जागावाटप यादी जाहीर करू,’ असे धनराज माने यांनी सांगितले. २० दिवसात प्रवेश प्रक्रिया आटपून ऑक्टोबरमध्ये महाविद्यालये सुरू व्हावीत, असा प्रयत्न आहे.