साहित्य आणि वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे पुढील वर्षी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यात तसेच नवी दिल्ली आणि गोवा येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली.
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला असून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत या विविध उपक्रमांसाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
येत्या ३१ मार्च पर्यंत राज्यातील जिल्ह्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन व विक्री, त्या त्या जिल्ह्यातील कवी, साहित्यिक, कलाकार यांचा सहभाग असलेले विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्र, काव्यवाचन, कथाकथन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ग्रंथोत्सवात सहभागी होता यावे, महणून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सहकार्य या उपक्रमास लाभले असल्याचेही कर्णिक म्हणाले.