विक्रोळीतील इंदिरा गांधी महाविद्यालयातील सोयीसुविधांची तपासणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे.
मुंबई विद्यापीठाने ४ एप्रिल रोजी बी.कॉम. तृतीय वर्षांच्या ‘ह्य़ुमन रिसोर्सेस मॅनेजमेंट’ विषयाची परीक्षा घेतली होती. विद्यापीठाने काढलेली या विषयाची दुसरी प्रश्नपत्रिका दोन महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिली नव्हती. याबाबत तक्रार आल्यानंतर विद्यापीठाने प्राचार्य डॉ. विजय जोशी आणि प्राचार्य डॉ. उषा मुकुंदन यांची समिती स्थापन करून तिला दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
या समितीच्या शिफारशीवरून विद्यापीठाने तत्काळ कारवाई करत विक्रोळीच्या इंदिरा गांधी महाविद्यालवर उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. या महाविद्यालयात नियमानुसार पुरेशा सोयी-सुविधा आहेत की नाही हे तपासण्याचे काम करणार असलेल्या या समितीत प्राचार्य डॉ. मधू नायर, प्राचार्य डॉ. गडदे आणि प्राचार्य डॉ. पारगावकर हे सदस्य असतील. ही समिती महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयातील सोयी व मनुष्यबळ यांची तपासणी करणार आहे.
या समितीला सकृतदर्शनी या महाविद्यालयात इतरही काही बाबींमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या परीक्षा केंद्रावर भ्रमणध्वनी व लघुसंदेशाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आधीचीच प्रश्नपत्रिका दिल्याचे उघड झाल्यामुळे या महाविद्यालयावर उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या समितीचा अहवाल मिळताच
तो महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळासमोर (बीसीयूडी) ठेवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.