‘मानवी संसाधन आणि हक्क’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांबाबत मोठय़ा प्रमाणावर असलेली संदिग्धता आणि पहिल्या उत्तरतालिकेवर उमेदवारांच्या हजारोंच्या संख्येने आलेल्या सूचना यामुळे परीक्षा होऊन तीन महिने झाले तरी २०१२च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ला यश आलेले नाही.
एमपीएससीने आपल्या मुख्य परीक्षेचे स्वरूप ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या (यूपीएससी) धर्तीवर आमूलाग्र बदलले आहे. परीक्षेचे बदलेले स्वरूप, वाढलेली काठीण्य पातळी आणि निगेटिव्ह गुणांकनामुळे मुख्य परीक्षेच्या निकालाविषयी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण, १ ते ३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या परीक्षेचा निकाल चार महिने झाले तरी जाहीर झालेला नाही. निकाल लांबण्याचे कारण कळत नसल्याने उमेदवारांमध्ये कमालीचा गोंधळ आहे. पुरेसे उमेदवार मुलाखतीच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरत नसल्याने निकाल लांबत असल्याची जोरदार चर्चा परीक्षार्थीमध्ये आहे. पण, यंदा उत्तरतालिकेवर मोठय़ा प्रमाणावर म्हणजे चार हजारांच्या आसपास आलेल्या सूचनांमुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांचे म्हणणे आहे.
तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक आदी वर्ग १ आणि २च्या ४३८ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून सुमारे सहा हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. नव्या स्वरुपात केवळ मराठी आणि इंग्रजी हे भाषा विषय वगळता सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ करण्यात आले आहे. तसेच, उमेदवारांना आपापल्या पसंतीचे विषय निवडण्याऐवजी विविध विषयांचा समावेश असलेले चार पेपर सोडवायचे होते. या शिवाय प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांमागे एक गुण कमी करण्याच्या ‘निगेटीव्ह’ गुणांकन पद्धतीमुळे मुख्य परीक्षेची काठीण्यपातळीही वाढली आहे.
परीक्षा झाल्यानंतर एमपीएससीने आठवडाभरात पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध केली. उमेदवारांनी या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवायचे होते. महिनाभरातच आयोगाकडे चार हजारच्या आसपास सूचना आल्या. उत्तरतालिकेवर इतक्या मोठय़ा संख्येने सूचना कधीच आल्या नव्हत्या, असे ठाकरे यांनी सांगितले. या सूचना त्या त्या विषयाच्या तज्ज्ञाकडे (प्राश्निक-पेपरसेटर) पाठवून अंतिम उत्तरतालिका तयार करण्याचे काम सुरू आहे. अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सूचनांचा अभ्यास करून अंतिम उत्तरतालिका तयार करण्याची जबाबदारी आयोगाच्या सचिवांवर आहे. मात्र, सचिव वैयक्तिक कारणास्तव दीर्घकालीन रजेवर असल्याने या कामाला विलंब होत असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. आणखी महिनाभर तरी निकाल जाहीर होणार नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले. या बहुतेक सूचना ‘मानवी संसाधन व मानवी हक्क’ (पेपर-३) या विषयाच्या पेपरमधील प्रश्नांबाबत आक्षेप उपस्थित करणाऱ्या आहेत. एकाच प्रश्नाची अनेक उत्तरे निघणे, प्रश्नातील संदिग्धता वा रोख स्पष्ट नसणे आदी कारणांमुळे या पेपरकडून उमेदवारांच्या फारशा अपेक्षा नाहीत.
बाराशे उमेदवार मुलाखतीच्या टप्प्यासाठी निवडले जाणे अपेक्षित आहे. परंतु, पेपर-३च्या गोंधळामुळे इतके उमेदवार निवडले जाणे कठीण आहे, अशी शंका एका उमेदवाराने उपस्थित केली.