सध्या शाळांमध्ये सूक्ष्मदर्शकातून एकावेळी एकाच विद्यार्थ्यांला काच पट्टीवरील विषाणू, सूक्ष्मजीव किंवा पेशी पाहाता येते. शिक्षकांना अंगुलीनिर्देश करून त्या काचपट्टीवरील दृश्य समजावूनही देता येत नाही. ही अडचण दूर करून, त्या काचपट्टीवरील विषाणू संगणकावर किंवा मोठय़ा पडद्यावर दाखविण्याची सोय करणाऱ्या ‘डिजिटल सूक्ष्मदर्शक यंत्रा’चे रविवारी मुंबईतील ५० शाळांना समारंभपूर्वक वाटप होणार आहे.
अंधेरीतील ‘श्री गोविंद बालमंदिर शिक्षण संस्थे’च्या अभिनव अशा ‘संशोधन प्रोत्साहन प्रकल्पा’ने हे पुढचे पाऊल टाकले आहे. अंधेरीतील रहिवाशी महेश अटाळे यांनी हा ‘डिजिटल सूक्ष्मदर्शक’ तयार केला आहे.
डिजिटल सूक्ष्मदर्शकामुळे संगणकावर किंवा मोठय़ा पडद्यावर काचपट्टीवरील विविध विषाणू जीव दाखविता येतात. तसेच, एका वेळी अनेक विद्यार्थ्यांना ते दृश्य पाहता येऊन शिक्षकांनाही व्यवस्थित समजावता येतात. यामुळे विज्ञान विषयाचे शिक्षणच अधिक प्रभावीपणे साधणार आहे, असे संस्थेचे प्रमुख कार्यवाह दयानंद सावंत यांनी सांगितले.
समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या नवनवीन संकल्पनांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागृत व्हावी, त्यांनी साकारलेल्या नवनिर्मिताला समाजापुढे आणावे यासाठी ‘संशोधन प्रोत्साहन प्रकल्पा’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ‘डिजिटल सूक्ष्मदर्शक’ हा सूक्ष्मदर्शक याच उपक्रमातून प्रकाशात आला. बाजारात डिजिटल सूक्ष्मदर्शक २५ हजारांपासून सात लाखादरम्यान उपलब्ध असताना अटाळे यांनी तो अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये तयार केला आहे.
रविवार २४ फेब्रुवारीला अंधेरीतील तेली गल्लीतील चटवाणी सभागृहात सकाळी १० वाजता शाळांना या डिजिटल सूक्ष्मदर्शकाचे समारंभपूर्वक वाटप होणार आहे. विज्ञान लेखक मोहन आपटे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. तर प्रमुख वक्ते म्हणून ‘विज्ञान भारती’चे जयंत सहस्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.
डिजिटल सूक्ष्मदर्शकाप्रमाणेच याआधी अंधांना ‘दृष्टी’ देणारा गॉगल, लाइफ अ‍ॅम्ब्युलन्स अशी सामान्यांना उपयोगी ठरणारी अनेक आगळीवेगळी उपकरणे या उपक्रमाच्या माध्यमातून प्रकाशात आली आहेत.