‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षण प्रक्रियेत उद्दिष्टांचे वैशिष्टय़ामध्ये रूपांतर करणाऱ्या नवविकास मंडळ शिक्षण संस्थेचे गेली ३५ वर्षे गतिमान विद्यालय म्हणून नावलौकिक मिळविलेले जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केसापुरी कँप, ता. माजलगाव, जि. बीड येथे न्यूनतेवर मात करून संपन्नतेकडे वाटचाल करण्यासाठी सतत धडपडणारे विद्यालय आहे.
एकाच घरात हॅलोजन बल्बचा प्रकाश पाडण्यापेक्षा हजारो घरांत पणती उजळून वाडय़ा-वस्त्या ज्ञानाने प्रकाशमान झाल्या पाहिजेत, असा दृढनिश्चय करून ग्रामीण भागांत तळमळीने बीडमधील माजलगाव तालुक्यात जवाहर विद्यालय कार्यरत आहे.
भौतिक झगमगाटापेक्षा भावनिक चकाकी, लकाकी देऊन गुणवत्ता उजळून काढण्यासाठी शिक्षकांची प्रामाणिक तळमळ दृश्य रूप धारण करताना दिसते ती जवाहर विद्यालयातच. औपचारिक शिक्षणाचा अभ्यासक्रम अनिवार्य आहेच. त्यासोबत चिरंतन मूल्यांची जोपासना करण्यासाठीचे काही उपक्रम असे.

विज्ञानदृष्टी व दृष्टिकोन- विज्ञानपत्रिकेचे सामूहिक वाचन, कुतूहल या सदरातून आठवडय़ातून एक दिवस प्रश्नोत्तरे, एक तुकडी एक प्रकल्प यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे प्रदर्शन भरविले जाते.
कला- चित्रांसाठी दरवर्षी एक प्रदर्शन, रंगभरण, मुक्त हस्त, निसर्गचित्र, व्यक्तिचित्रांच्या विलोभनीय स्पर्धा यातून घडणाऱ्या बाल चित्रकारांची चित्रे जपान, फ्रान्स, इंग्लंड या देशात पोहोचली आहेत. विज्ञान रांगोळी प्रदर्शन भन्नाटच असते.
चला सारे गाऊ या- एक तुकडी एक गीत, पाऊस गाणी, अभंगवाणी, लोकगीते या स्पर्धेतून विद्यार्थी संगीताकडे आकृष्ट होतात. विज्ञान गीत, गणित गीत, मराठवाडा गीत, रान माझे पंढरी गीत, हे राष्ट्रध्वजा यांसारखी अनेक नवीन गीते जी याच शाळेतील शिक्षकांचीच शब्द व संगीत रचना असते म्हणूनच ही गीते मुले आवडीने गुणगुणत राहतात.
लेखन कौशल्य व भाषिक सौंदर्य-  सुंदर अक्षराला आभाळ मोकळे करण्यासाठी, मनातल्या भावना अंकुरीत करण्यासाठी भित्तिपत्रक दरमहा प्रत्येक वर्गासाठी विषयानुसार दिले जाते. पाठय़क्रमातील कविता आपल्या बोलीभाषेत अनुवादित करून सादरीकरणाची मजा  विद्यार्थी घेतात. ज्ञानांकुर हे वार्षिक हस्तलिखित मनाचा ठाव घेणारे असते.
मैत्री पुस्तकांशी – ऑफ पीरियडला तासिकेत मुलांसाठी ग्रंथालय खुले असते. मराठी विश्वकोश, इनसायक्लोपीडिया मुलांसाठी उपलब्ध करून दिला जातो. अवांतर वाचनासाठी प्रत्येकाच्या आवडीनुसार ग्रंथ दिले जातात. दरवर्षी मुलांसाठी दोन उत्कृष्ट वाचक पुरस्कार जवाहर विद्यालय देते.
लोकशाही नेतृत्व- जुलैमध्ये एका शनिवारी निवडणूक होते. पदाधिकारी निवडले जातात. हे व मागील वर्ष म्हणजे एक इतिहासच. संपूर्ण विद्यार्थी, संसद पदाधिकारी मुलीच आहेत.
संवाद थोरांशी- आजवर यदुनाथ थत्ते, मृणाल गोरे, ना. य. डोळे, महावीर जोंधळे, माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख, इंद्रजीत भालेराव, देवीदास फुलारी, भगवान देशमुख, नारायण सुमंत, विजय पोहनेरकर, कल्याण कदम, सुहासिनी इर्लेकर, सय्यद अल्लाउद्दीन, नरेंद्र चपळगावकर यांच्याशी व यांसारख्या अनेक मान्यवरांची या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला आहे.
मोबाइलवरून थेट अभ्यासवर्ग- अभ्यासक्रमातील कवी- लेखकांशी थेट मोबाइलवरून चर्चेचा अभ्यासवर्गही येथे आयोजिला जातो. काही महिन्यांपूर्वीच अजिम नवाझ यांच्याशी संवाद करून दहावीच्या मुलांनी कविता अभ्यासली होती.
     दर्जेदार औपचारिक शिक्षणासोबतच शाळा सोडून गेल्यावर जे चिरकाल स्मरणात राहते असे खरे शिक्षण हे या शाळेचे वैशिष्टय़ आहे. माजी शिक्षक आमदार शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत डी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असणाऱ्या संस्थेचे जवाहर विद्यालय, चळवळीने गतिमान विद्यालय म्हणून ओळखले जाते.
– प्रभाकर साळेगावकर
भ्र. संवाद- ९४२२२९५३०४
जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केसापुरी वसाहत,
ता. माजलगाव, जि. बीड.