रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उमा चंद्रशेखर वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूपद २ नोव्हेंबरपासून रिक्त होते. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी गुरुवारी डॉ. वैद्य यांच्या नावाची घोषणा केली. डॉ. वैद्य सध्या मुंबई विद्यापीठात संस्कृत विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गुरूदेव टागोर तुलनात्मक साहित्य अध्यासनाचे प्रमुखपदही त्यांनी भूषविले आहे. कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. वैद्य या पदावर पुढील पाच वर्षे राहतील.
डॉ. वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून १९७२ साली प्रथम येण्याचा मान मिळवित विशेष प्राविण्यासह पदवी शिक्षण पूर्ण केले. १९७४ साली त्यांनी प्रथम श्रेणीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
मुंबई विद्यापीठातून १९७९ साली त्यांनी संस्कृत या विषयातून पीएचडी मिळविली. विल्सन महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून काम केल्यानंतर त्या विद्यापीठात रूजू झाल्या. डॉ. वैद्य यांना अध्यापन, प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत ७३ संशोधन प्रबंध जमा आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्या. एफ. आय. रिबेलो यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने राज्यपालांकडे डॉ. वैद्य यांच्यासह तिघांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर राज्यपालांनी या तिन्ही उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू म्हणून डॉ. वैद्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
संपूर्णपणे संस्कृत विषयासाठी वाहिलेले हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे, माझा आजवरचा अध्ययनातील, अध्यापनातील, संशोधनातील अनुभव वापरून संस्कृतसाठी भरीव काम करण्याची संधी या नियुक्तीमुळे मला मिळाली आहे. त्याचा उपयोग आनंदाने, नेकीनं आणि प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे डॉ. उमा वैद्य यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.