शिक्षण क्षेत्रातील गोंधळ दूर करण्यासाठी कोणताही महत्त्वाचा निर्णय शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी किमान एक वर्ष आधी घेण्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन या वर्षी किमान बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी हवेतच विरणार आहे. कारण, बारावीच्या विज्ञान-गणित विषयांच्या परीक्षांच्या स्वरूपाबाबत असलेल्या गोंधळाबरोबरच अभियांत्रिकी प्रवेशाच्या निकषांबाबत असलेला संभ्रम दूर करण्यात तावडे यांच्या शिक्षण विभागाला बारावीचे पहिले सत्र संपत आले तरी यश आलेले नाही. परिणामी यंदा विज्ञान शाखेच्या आणि त्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

कोणतेही नियोजन न करता यंदा दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता अचानक घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेमुळे ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चे नियोजन पार कोलमडून गेले आहे. त्यामुळे, फेब्रुवारी-मार्च, २०१६ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रकही मंडळाला निश्चित करता आलेले नाही. फेब्रुवारी-२०१६ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण वेळापत्रक तर सोडाच, बारावीच्या विज्ञान-गणित विषयांच्या परीक्षा दहावीप्रमाणे भाग-१ आणि भाग-२ अशा दोन स्वतंत्र दिवशी घेणार का, याबाबत असलेला गोंधळही दूर झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक मात्र चांगलेच कोलमडले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांचे अभियांत्रिकी प्रवेशांबाबतचे निकषही तावडे यांच्या विभागाने निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे, यंदा कधी नव्हे ते बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी पार गोंधळून गेले आहेत.
आठ दिवस परीक्षा घ्याव्यात
बारावीचा विज्ञान-गणित विषयांचा सुधारित अभ्यासक्रम आधीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळे विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र)आणि गणित अशा चार विषयांच्या प्रत्येकी भाग -१ आणि भाग-२ अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या दिवशी (एकूण आठ दिवस) परीक्षा घेतल्या जाव्या, अशी मागणी आहे.

दहावीकरिता तर मागणीही नव्हती
या वर्षी मंडळाने दहावीच्या विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांच्या परीक्षांबाबत हा बदल केला आहे. दहावीबाबत अशी कोणती मागणी नसतानाही हा निर्णय घेतला गेला. बारावीसाठी तर गेली तीन वर्षे आम्ही लढत आहोत. पण, आमच्या मागणीची दखल घेतली गेलेली नाही,’ अशी पुस्तीही राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनेचे सरचिटणीस देशमुख यांनी जोडली. मात्र, दहावीप्रमाणे बारावीच्या परीक्षेकरिता हा बदल करण्याचा विचार नाही. त्यामुळे, २०१६च्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार असल्याचा खुलासा यावर मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी केला आहे.