शिक्षणसंस्था चालकांचाही बारावीच्या परीक्षेसाठी असहकार

शिक्षक, शिक्षकेतरांबरोबरच शिक्षणसंस्था चालकांनीही विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला

प्रतिनिधी, पुणे | February 12, 2013 03:19 am

शिक्षक, शिक्षकेतरांबरोबरच शिक्षणसंस्था चालकांनीही विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर काहीही परिणाम होत नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी, बृहत आराखडय़ाप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या शाळा खासगी शिक्षण संस्थानाही देण्यात याव्यात, शिक्षण संस्थाना वेगळे वीजदर लागू करावेत अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणसंस्था महामंडळाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शिक्षणसंस्था महामंडळाचे सरकार्यवाह डॉ. आर. पी. जोशी यांनी सांगितले, ‘‘या बहिष्काराबाबत आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशीही पत्रव्यवहार केला आहे. अनेक वेळा आश्वासने मिळूनही शासनाकडून कार्यवाही होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.’’ शिक्षणसंस्था चालकांनी टाकलेल्या बहिष्काराचे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर काही ठिकाणी पडसाद उमटले आहेत.

First Published on February 12, 2013 3:19 am

Web Title: education institutions had also not helping for hsc exams