शिक्षक तयार करणाऱ्या संस्थाच शिक्षक आणि प्राचार्याविना काम करीत असून, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी टास्क फोर्स कमिटी नेमण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले. महाविद्यालयात प्राचार्य असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ८२२ महाविद्यालयांपैकी ४५० हून अधिक महाविद्यालये पूर्णवेळ प्राचार्याविना काम करीत आहेत. मात्र ज्या ठिकाणी भावी शिक्षक घडत असतात, अशा अध्यापक महाविद्यालयांची देखील शिक्षक आणि प्राचार्याविना दैनावस्था आहे.
विद्यापीठ क्षेत्रातील अनेक विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयांमध्ये एनसीटीईच्या निकषानुसार पुरेशा संख्येने पात्र व विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राचार्य व शिक्षक नियुक्त नाहीत. विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या २०१०-११च्या वार्षिक अहवालात ही वस्तुस्थिती नमूद करण्यात आल्याची माहिती भंडाऱ्याच्या शासकीय बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पं. म. मोहीतकर यांनी विधिसभेत दिली. नागपूर विद्यापीठात एकूण ११४ संलग्नित महाविद्यालये आहेत. त्यात प्राचार्य नसलेली ५८ महाविद्यालये आहेत. प्राचार्य आणि शिक्षकही नसलेली ३४ अध्यापक महाविद्यालये आहेत. प्राचार्य नसलेली पण एक किंवा दोन शिक्षक असलेली २४ महाविद्यालये आहेत, तर प्राचार्य आणि एक किंवा दोन शिक्षक असलेली आठ महाविद्यालये आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठ मिळून केवळ पदव्यांच्या छपाईचे काम करतात, असा आरोपही या वेळी करण्यात आला.
ज्या महाविद्यालयात मान्यताप्राप्त शिक्षक आणि प्राचार्य नाहीत अशा महाविद्यालयांतील विद्यार्थी शिकतात कसे, अभ्यास कसा करतात, त्यांचे पेपर कसे तपासले जातात, या सर्वच प्रश्नांवर खमंग चर्चा झाली. या वेळी स्थानिक चौकशी समितीने (एलईसी) शिफारस केल्यास संबंधित महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करण्यात येईल, असे एक मत बीसीयूडी संचालक डॉ. अरविंद चौधरी यांनी विधिसभा अध्यक्षांच्या वतीने केले. मात्र नाराज सदस्य डी. के. अग्रवाल यांनी एलईसीला या कामात दोषी धरू नका, असे मत व्यक्त केले. मृत्युंजय सिंग यांनी प्राचार्य आणि शिक्षक नसलेल्या महाविद्यालयांमध्ये अध्यापन न होता विद्यापीठ केवळ पदव्या वाटण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला तर नेहमीप्रमाणे डॉ. बबन तायवाडे यांनी पात्रताधारक शिक्षकांचा तुटवडय़ाची माहिती देत तात्पुरत्या शिक्षकांवर भर दिला. तायवाडे यांच्या भावनेशी सहमती दर्शवत मोहीतकरांनी भावनेवर विद्यापीठ चालत नसल्याचे स्पष्ट करून एकप्रकारे असहमतीच दर्शवली. महाविद्यालयात शिक्षक व प्राचार्य नसणे अतिशय गंभीर बाब असून त्यांच्या नियुक्तीसाठी येणाऱ्या अडथळ्यांच्या तपासण्यासाठी टास्क फोर्स कमिटी स्थापन करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. त्याप्रमाणे चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन विद्यापीठाच्या वतीने सभागृहात देण्यात आले.