गतिमंद मुलींचा ‘स्पेशल ऑलिंपिक’मध्ये सुवर्णवेध

हॉकीमध्ये एकाग्रता आणि वेग या दोन्हीचा एकाचवेळी कस लागतो. एकात बुद्धीची तर दुसऱ्यात शारीरिक

प्रतिनिधी, मुंबई | February 9, 2013 2:24 AM

हॉकीमध्ये एकाग्रता आणि वेग या दोन्हीचा एकाचवेळी कस लागतो. एकात बुद्धीची तर दुसऱ्यात शारीरिक चापल्याची कसोटी लागते. पण, जन्मत: या दोन्ही गोष्टीचा अभाव असलेल्या भारताच्या ‘विशेष’ मुला-मुलींनी हिंमत आणि सरावाच्या जोरावर दक्षिण कोरियात भरलेल्या ‘वल्र्ड विंटर गेम्स’ या स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत सुवर्ण व रौप्य पदकावर नाव कोरले आहे.
जगभरातील ‘विशेष’ मुलांसाठी दर तीन वर्षांनी ही स्पर्धा भरविली जाते. तब्बल ११० देशातील सर्व प्रकारच्या गतिमंद, मतिमंद मुलेमुली यात सहभागी होतात. दक्षिण कोरियातील प्युआँग चँग या शहरात २८ जानेवारी ते ५फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पार पाडल्या. यात प्लोअर हॉकीमध्ये भारतातील मुलींच्या व मुलांच्या चमूने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.
फ्लोअर हॉकीबरोबरच स्नोइंग, स्केटिंग आदी बर्फातील खेळांमध्ये भारताने एकूण ७५ पदकांवर भारताने आपले नाव कोरले आहे. पदकांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याचे या स्पर्धेत भारताच्या वतीने हॉकी चमूचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अशोक जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
महाराष्ट्रातून एकूण सात मुलेमुली यात सहभागी झाली होती. मुंबईचा सागर कदम या १७ वर्षांच्या हॉकीपटूने मुलांच्या हॉकी चमूच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. गोरेगावच्या ‘पुनर्वास’ या गतिमंद मुलांच्या संस्थेत सागर शिकतो. त्याचे वडील एका खासगी पर्यटन संस्थेत वाहनचालक म्हणून काम करतात. पण, शारीरिक व बौद्धिक विकलांगतेवर मात करीत सागरने हॉकीपासून नृत्यापर्यंत वेगवेगळ्या खेळांची आणि कलांची आवड जपली आहे, असे त्याचे प्रशिक्षक माधव भालेराव सांगतात.
भारताच्या मुलींच्या चमूत मुंबईच्या देवांशी पारीख आणि नीलम मोतीरामानी यांचा समावेश होता. या मुली मालाडच्या वसारीबाई डागरी या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. या शिवाय योगीराज राठोड (लातूर), आशीष सावेकर (कोल्हापूर), पूनम रणपिसे (पुणे) आणि निवेदक म्हणून नेहा नाईक ही मुले या ऑलिंपिकमध्ये सहभागी झाली होती. नेहाचे इंग्रजीवरही चांगले प्रभुत्व असल्याने तिने या स्पर्धामध्ये भारताच्या वतीने निवेदकाची भूमिका पार पाडली.
दर तीन वर्षांनी भरविल्या जाणाऱ्या स्पेशल ऑलिंपिकमध्ये भारत गेली अनेक वर्षे सहभागी होतो आहे. त्यापैकी खेळाडूची एकाग्रता, वेग आणि निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारा फ्लोअर हॉकी हा या स्पर्धेचा महत्त्वाचा खेळ मानला जातो. फ्लोअर हॉकीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करण्याचा मान मुलींच्या चमूने मिळविला आहे. भारताच्या मुलींच्या चमूने बांगलादेशला हरवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर मुलांच्या चमूला चीनच्या मुलांनी पराभूत करीत रौप्य पदकावर समाधान मानायला लावले.
फ्लोअर हॉकी
या खेळाची सुरुवात ब्रिटीश शिपायांनी सन १८०० मध्ये केली. सामान्यपणे हा खेळ हॉकीसारखाच असून ‘इनडोअर’ पद्धतीने खेळला जातो. हा खेळाचे मैदान हे बास्केटबॉलच्या कोर्टसारखे असते. सन १९७० पासून या खेळाचा समावेश विशेष हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये केला गेला आहे. या खेळातील हॉकी स्टीक ही नेहमीच्या हॉकी स्टीकपेक्षा थोडी अधिक वक्राकार असते. विशेषत लहान मुलांना बर्फावरील हॉकी (आईस हॉकी) शिकवण्यासाठी या खेळाचा वापर केला जातो.

First Published on February 9, 2013 2:24 am

Web Title: golden game of slowspeed girls in special olympic