यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशाचा पेच निर्माण होणार आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत एफवायबीकॉम आणि त्याच्याशी संबंधित बीएएफ, बीएमएस आदी स्वयअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षीच चुरस असते. या शिवाय बीएस्सीच्या संगणक विज्ञान, बीएस्सी-आयटी या अभ्यासक्रमांमध्येही विद्यार्थ्यांमध्ये अटीतटीची झुंज असते. तर कला टीवायबीए आणि बीएमएमकरिता काही निवडक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, असा विद्यार्थ्यांना आग्रह असतो. दरवर्षी बारावीला काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयांना पदवीकरिता बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देता येतात. परंतु, यंदा बारावी निकालाचा टक्का सर्वच शाखांमध्ये चांगलाच वधारल्याने पदवीच्या प्रवेशांसाठीची चुरस अटीतटीची असेल. काही महाविद्यालयांना तर यंदा बाहेरच्या विद्यार्थ्यांकरिता जागा उपलब्ध करून देणेही शक्य होणार नाही.
एनएम महाविद्यालयात बारावीच्या १००१ तर पदवीच्या ९६० जागा आहेत. या महाविद्यालयाचा निकाल यंदा १०० टक्के लागल्याने बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताच येणार नाही. ‘आम्हाला आमचेच विद्यार्थी सामावून घेताना नाकीनऊ येणार आहे. त्यातून स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांमुळेच या विद्यार्थ्यांना सामावून घेणे शक्य आहे,’अशी प्रतिक्रिया एनएम महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मंत्री यांनी दिली. चर्चगेटच्या हिंदुजा महाविद्यालयातही हीच पंचाईत होणार आहे. येथे बारावीच्या १३०० पैकी १२९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना टीवायबीकॉमच्या जागांवर सामावून घेणे कठीण आहे. या विद्यार्थ्यांनी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांचे पर्याय निवडले तरच आम्हाला या विद्यार्थ्यांना पदवीला प्रवेश देऊन काही जागा बाहेरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ‘नॉन-गव्हर्नमेंट कॉलेज प्रिन्सिपल्स असोसिएशन’चे अध्यक्ष टी. ए. शिवारे यांनी व्यक्त केली.
‘आजकाल कला शाखेकडेही गुणवान विद्यार्थी वळू लागले आहेत. त्यामुळे, या शाखेतील स्पर्धाही वाढली आहे. परिणामी या शाखेतून काही ठराविक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असेल,’ अशी प्रतिक्रिया रूईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर यांनी दिली.
 
विज्ञान आघाडीवर, कलाशाखेतही वाढ
शाखा निहाय निकालांमध्ये नेहमीप्रमाणे विज्ञान शाखा आघाडीवर असून राज्यात या शाखेचा निकाल ९३.६७ टक्के इतका लागला आहे. वाणिज्य शाखेच्या निकालातही लक्षणीय वाढ झाली असून या शाखेचा निकाल यंदा ८९.९७ टक्के इतका लागला आहे. कला शाखेच्या निकालात गत वर्षीच्या तुलनेत १५.४१ टक्क्यांनी वाढ झाली असून यंदा हा निकाल ८६.३३ टक्के इतका लागला आहे.