बहिष्कार, संप, बंद अशा कोणत्याही अडचणी न येता राज्यभरात गुरूवारी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली असली, तरी आता उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रश्न उभा राहिला आहे.
गेले काही दिवस बारावीच्या परीक्षेवर विविध संघटनांचे बंद, बहिष्कार यांचे सावट होते. मात्र, कोणतीही अडचण न येता राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू झाली. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा सुरू झाली आहे. राज्यभरातून १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यात १६४ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. नागपूर विभागात सर्वाधिक ६८ कॉपीबहाद्दर विद्यार्थी सापडले आहेत. कोकण आणि लातूर विभागामध्ये एकही कॉपी पकडण्यात आलेली नाही. याशिवाय नाशिक विभागात ४३, पुणे विभागात १९, औरंगाबाद विभागात १८, अमरावती विभागात ९, मुंबई विभागात ५ आणि कोल्हापूर विभागात २ विद्यार्थ्यांची कॉपी पकडण्यात आली आहे.
कोणत्याही अडचणींशिवाय परीक्षा सुरू झाली असली, तरी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा बहिष्कार कायम आहे. बारावीच्या लेखी परीक्षांच्या मूल्यमापनाचे कामकाज मुख्य नियामक, वरिष्ठ नियामक हे नियामक व परीक्षण करणार नाहीत, असे पत्रक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे देण्यात आले आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी सोमवारपासून (२५ फेब्रुवारी) सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आणि निकालावर बहिष्कार टाकल्यामुळे मूल्यमापनाबाबत अजूनही अनिश्चितता आहे.