जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रापाठोपाठ बारावीची १ मार्चला होणारी गणिताची आणि ४ मार्चला होणारी अर्थशास्त्राची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार गणिताची परीक्षा ४ मार्चला व अर्थशास्त्राची १७ मार्चला होईल. तसेच, बारावीच्या परीक्षेमुळे चौथी-सातवीची शिष्यवृत्तीची परीक्षाही पुढे ढकलण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारीच्या जीवशास्त्र व अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशी चौथी-सातवीची शिष्यवृत्तीची परीक्षा आली होती. राज्यभरातून चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला तब्बल १७ लाख विद्यार्थी बसणार आहेत. तर जीवशास्त्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सुमारे तीन लाख. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ज्या परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी शिष्यवृत्ती आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा होणार आहेत तिथे मोठा गोंधळ उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे संचालक महावीर माने यांनी सांगितले.
भौतिकशास्त्र आणि गणिताच्या परीक्षेत केवळ तीन दिवसांचे अंतर किमान पाच दिवस करण्यात यावे, अशी मागणी समाजातील काही घटकांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन गणिताची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
बारावीच्या सुधारित वेळापत्रकामुळे गणिताच्या परीक्षेच्या अभ्यासाकरिता विद्यार्थ्यांना सात दिवसांची उसंत मिळणार आहे. सुधारित वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर २८ जानेवारीला सायंकाळपर्यंत उपलब्ध होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली.

सहानुभूतीपूर्वक विचार करू
मुलांची काही चूक नसल्याने त्यांना याचा फटका बसू नये म्हणून मंडळाने या प्रकाराबाबत शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे. या मुलांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा यासाठी मंडळाने विभागाला पत्र लिहून कळविले आहे. याबाबत सोमवारी निर्णय होईल. तसेच मुलांची दिशाभूल करून प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल.    – सर्जेराव जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ