मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण संस्थेचा गोंधळात गोंधळ
मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागापासून ते विविध स्तरांवरील गोंधळ एकामागोमाग बाहेर येत असतानाच आता विद्यापीठाच्या ‘अर्थ’पूर्ण समजल्या जाणाऱ्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेतील (आयडॉल) विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी पळापळ करावी लागत असल्याचे समोर आले आहे. प्रवेश घेऊन एक महिना उलटला तरीही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत.
शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दूर व मुक्त शिक्षणाचा पर्याय म्हणून विद्यापीठात स्वतंत्र संस्था काम करते. मात्र या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाची पुस्तके मिळालेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे.
यामध्ये एमए राज्यशास्त्र आणि एमए मराठी या विषयांच्या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या वर्षीही हाच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. राज्यशास्त्र या विषयाच्या इंग्रजी माध्यमातील पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके मिळालेली नाहीत. यामुळे विद्यार्थी पुस्तकांसाठी वणवण फिरत आहेत. इतकेच नव्हे तर या विषयाचे तज्ज्ञ इंग्रजीमध्ये पाठय़पुस्तके लिहून देतात, मात्र ती भाषांतरित करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे हा उशीर होत असल्याचे सूत्रांकडून समजते.

अधिकाऱ्यांना वेळ नाही, ई-मेल करा!
आयडॉलमध्ये अशा प्रकारचे गोंधळ दरवर्षी होतात. या प्रश्नी उत्तर देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांना वेळ देत नसून त्यांना ई-मेलद्वारे संवाद साधण्यास सांगत असल्याचा आरोप अधिसभेचे माजी सदस्य संजय वैराळ यांनी केला आहे. दरम्यान, या प्रश्नी संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चा झाली असून त्यांना महिनाभरात पुस्तके उपलब्ध करून दिली जातील असे संस्थेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.