‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्रवेशाचा मार्ग ‘जेईई’च्या माध्यमातून जातो. तो अधिक सुकर करण्यासाठी ‘आयआयटीत’ शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या व्याख्यानांचे चित्रीकरण करणे, त्यांच्याकडूनच नोट्स तयार करून घेणे आणि ‘ऑनलाईन गप्पां’चे आयोजन करणे असा नवा ‘फॉम्युर्ला’ खासगी कोचिंग क्लासेसमधून सुरू झाला आहे. उद्योगक्षेत्रात करिअर करण्याच्या ईर्षेने झपाटलेल्या माजी ‘आयआयटीयन्सनी’च हा फाम्र्युला तयार केला आहे, हे विशेष.
विवेक गुप्ता, नीतेश साळवी आणि मिरीक गोगरी यांची वय वर्षे अवघे ‘दोन’ असलेली ‘प्लॅन्सेस एज्युसोल्युशन प्रा. लिमिटेड’ ही कंपनी. हे तिघेही मुंबई-आयआयटीचे माजी विद्यार्थी. नोकरीऐवजी व्यवसाय करण्याच्या विचारांनी झपाटल्याने त्यांनी ‘प्लॅन्सेस’ सुरू केली.
आजमितीस देशभरातील १५ हून अधिक खासगी कोचिंग क्लासेस पैसे मोजून आपल्या विद्यार्थ्यांकरिता शिकवणीचा हा नवा फाम्र्युला प्लॅन्सेसकडून ‘आऊटसोर्सिग’द्वारे घेतात. यात आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील नामवंत क्लासेससह महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, लातूर येथील खासगी कोचिंग क्लासेसचाही समावेश आहे.
‘जेईई’मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन व्याख्याने ‘प्लॅन्सेस’ तयार करवून घेते. तसेच, ‘आयआयटीयन्स’नी तयार केलेल्या नोट्स, चाचण्यादेखील उपलब्ध करून देते.
या शिवाय एखाद्या विषयासंबंधात विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असल्यास ऑनलाईन गप्पांच्या माध्यमातून त्यांची उकल करण्याची संधी ‘प्लॅन्सेस’ देते. यात सर्वाधिक प्रतिसाद ‘प्लॅन्सेस’च्या रेकॉर्ड केलेल्या व्याख्यानांना आहे. त्यामुळे, काही क्लासचालकांनीच ही व्याख्याने, नोट्स, चाचणी परीक्षा ‘आऊटसोर्स’ करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची शक्कल लढविली आहे.
इंजिनीअरिंगमध्ये करिअर करणाऱ्यांची पहिली पसंती असते ती ‘आयआयटी’ला. पण, या संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी ‘जेईई’ (सामाईक प्रवेश परीक्षा) या खडतर परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करावा लागतो. आता तर ही परीक्षा मुख्य आणि अॅडव्हान्स या दोन टप्प्यात घेतली जाते.
‘जेईई’च्या अभ्यासातून आलेल्या अडचणींपासून धडा घेत आम्ही हा फार्मुला तयार केला. ही कल्पना पुढे इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यातून काही अर्थप्राप्तीही करता येईल का, या उद्देशाने ‘प्लॅन्सेस’ची निर्मिती करण्यात आली. पण, सामान्य विद्यार्थ्यांबरोबरच क्लासचालकांकडूनही याला मागणी आली आहे. त्यातही आयआयटीयन्सच्या लेक्चर्सना क्लासचालकांकडून विशेष मागणी असते,’ असे ‘प्लॅन्सेस’चे नीतेश साळवी यांनी सांगितले.
‘आयआयटीयन्स’ची फौज
व्याख्याने, नोट्स तयार करण्यासाठी ‘प्लॅन्सेस’ने ‘जेईई’मध्ये यश मिळविलेल्या आयआयटीयन्सची फौजच नेमली आहे. या विद्यार्थ्यांना डिसेंबर, मे, जून या महिन्यातील सुट्टीकाळात किंवा त्यांच्या सोयीनुसार एक-दीड महिन्याच्या इंटर्नशीपवर नेमले जाते. त्यासाठी महिना १० ते ५० हजार रुपयांपर्यंतचे ‘स्टायपेंड’ही दिले जाते. सुट्टीत घरी जाण्याऐवजी आम्ही या ठिकाणी काम करून थोडीफार कमाई करतो. कामाचा अनुभव मिळतो तो वेगळाच, असे सौरभ चॅटर्जी या मुंबई-आयआयटीत पहिल्या वर्षांला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांने सांगितले. तर विजय सेनापती या तृतीय वर्षांच्या कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांला संगणकावरील ‘कोडिंग-डिकोडिंग’ पासून सुटका हवी होती. व्याख्याने देणे, नोट्स तयार करणे हे काम यापेक्षा निश्चितच वेगळे होते. म्हणून सुट्टीत आंध्रमधील आपल्या घरी जाण्याऐवजी इथे काम करणे पसंत केले, असे विजयने सांगितले.