‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (आयआयटी) प्रवेशासाठी या वर्षी पुन्हा एकदा ‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (जेईई) मांडवाखालून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या पहिल्या २० पर्सेटाइलमध्ये येण्याच्या बंधनातून मोकळीक देण्यात आली आहे. बारावीच्या २०१२ च्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र असेल. प्रवेश देताना मात्र या विद्यार्थ्यांच्या अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या गुणांचाच विचार केला जाणार आहे. अर्थात पुनर्परीक्षार्थीना देण्यात आलेली ही मोकळीक केवळ या वर्षांपुरती मर्यादित असेल. पुढील वर्षांपासून पुनर्परीक्षांर्थीना जेईईबरोबरच बारावीची परीक्षाही नव्याने द्यावी लागणार आहे.
आयआयटी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी चांगलीच चुरस असते. आयआयटीसाठी केवळ जेईईचे गुणच ग्राह्य़ धरले जात असल्याने बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी पुन्हा पुन्हा आपले नशीब अजमावतात. नियमाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांला केवळ दोन वेळाच जेईई देता येते. तरीही जेईई देणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल २० टक्के पुनर्परीक्षार्थी असतात.
आता आयआयटी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांनाही महत्त्व आल्याने पुनर्परीक्षार्थीचे काय करायचे असा प्रश्न होता. जेईई आता मुख्य आणि अ‍ॅडव्हान्स असा दोन स्वरूपांत होणार आहे. मुख्य परीक्षेतील पहिले दीड लाख विद्यार्थी अ‍ॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र, हे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत त्या त्या शिक्षण मंडळाच्या पहिल्या २० पर्सेटाइलमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणून यापुढे आयआयटी प्रवेशासाठी पुनर्परीक्षार्थीना बारावीची परीक्षाही पुन्हा द्यावी लागणार आहे.
२०१३ हे या बदललेल्या स्वरूपातील परीक्षेचे पहिले वर्ष असल्याने दुसऱ्यांदा परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ या वर्षांपुरते आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत. मात्र, त्यांना बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे बंधनकारक असणार आहे. त्यापेक्षा कमी गुण असल्यास त्यांना बारावीची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल.