आजपासून ‘भारतीय इतिहास परिषद’

इतिहासाविषयी वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष आणि शास्त्रीय लिखाणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘दि इंडियन हिस्ट्री

प्रतिनिधी , मुंबई | December 28, 2012 3:58 AM

इतिहासाविषयी वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष आणि शास्त्रीय लिखाणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे (भारतीय इतिहास परिषद) ७३वे अधिवेशन उद्यापासून (शुक्रवारी) मुंबई विद्यापीठात सुरू होत आहे.
तब्बल ३२ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला ही परिषद भरविण्याचा मान मिळाला आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत, कुलगुरू राजन वेळुकर, भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष वाय. सुब्बरायलू यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री शशी थरुर, प्रा. इरफान हबीब, डॉ. रोमिला थापर, डॉ. अरुण बंडोपाध्याय, पद्मभूषण डॉ. रामचंद्र गुहा, प्रा. आर. सी. ठकरान, डॉ. स्नेह महाजन आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाला देश आणि जगभरातून सुमारे दोन हजाराहून अधिक इतिहासकर या परिषदेला हजेरी लावतील. यात अभ्यासक विविध विषयावर आपले संशोधन निबंध सादर करतील. याव्यतिरिक्त ‘व्हिज्युअल आर्ट्स आणि इतिहास’, इतिहास लेखनातील साहित्य आणि वस्तुस्थिती या विषयावर अलिगढ विद्यापीठाच्या वतीने परिसंवाद आयोजिण्यात येणार आहे.
इतिहासातील शास्त्रीय लिखाणाला प्रोत्साहन देणे, इतिहासाशी संबंधित विविध संस्था आणि विद्यापीठांमधून झालेले संशोधन एकत्रित करणे आणि इतिहास संशोधनाची अन्य साधने धुंडाळणे हे या परिषदेच्या आयोजनामागील उद्दिष्ट आहे.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, दत्तो वामन पोतदार, रियासतकार डॉ. गोविंद सखारास सरदेसाई, महामहोपाध्याय पी.व्ही. काणे, ए. एस. अळतेकर, ए. आर. कुलकर्णी, जी. एच. खरे, पी. एम. जोशी, व्ही. व्ही. मिराशी आदी महाराष्ट्रातील नामवंत इतिहासकारांचा या ना त्या कारणाने या परिषदेशी संबंध आला आहे.   

First Published on December 28, 2012 3:58 am

Web Title: indian history conference from today
टॅग: Indian-history