मुंबई विद्यापीठाच्या ‘आईस’ या उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी ‘सेंट्रल युनिव्‍‌र्हसिटी ऑफ हैदराबाद’चे कुलगुरू डॉ. रामकृष्ण रामस्वामी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
संशोधन आणि अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी प्रत्येक शनिवारी विद्यापीठातर्फे व्याख्यान आयोजित केले जाते. १३ एप्रिलपर्यंत हा उपक्रम चालेल. ‘ऑर्डर आऊट ऑफ केऑस -केऑस आऊट ऑफ ऑर्डर’ या विषयावर प्रा. रामस्वामी बोलतील.
प्रा. रामस्वामी हे २०११पासून हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे फेलोही होते. प्रा. रामस्वामी यांना केमिकल डायनामिक्स, क्लासिकल अ‍ॅण्ड क्वॉटम केऑस व जेनोमिक्स या विषयातली संशोधनात विशेष रूची आहे. २०१० साली त्यांना राजा रामण्णा लेक्चरर इन फिजिक्स हा पुरस्कार मिळाला आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानांना हजेरी लावता येईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवन येथे हे व्याख्यान होईल.