‘ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळा’ची ‘मिरॅकल’ ही नावीन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण देणारी पंढरपूर जिल्ह्य़ातील पहिलीच पूर्व प्राथमिक शाळा. या शाळेत मुलांना चार भिंतीच्या कोंडवाडय़ात बसवून ठेवले जात नाही. मुलांच्या कलाने मैदानात, झाडाखाली, खेळाद्वारे शिकवण देणारी ‘जादुई शाळा’ अशी तिची ओळख आहे.
पंचज्ञानेंद्रियामार्फत संकल्पना समजून घेण्यास मदत करणाऱ्या अनेक नावीन्यपूर्ण व शास्त्रोक्त अध्ययन तंत्रांचा वापर शाळेत केला जातो. इथे मुलांना मुळाक्षरे शिकविली जात नाही. मुलांना पांढऱ्या कार्डवरील लाल ठळक अक्षरातील शब्द पद्धतीने दाखविले जातात. एक शब्द १५वेळा सेकंदभर मुलांच्या नजरेसमोरून गेला की तो आपोआप मेंदूत चित्ररूपात फिट्ट बसतो. मग वाक्यांची मांडणी करून असे शब्द मुलांना दाखविले जातात की मुले वाचायला लागतात. शाळेतील अडीच ते पाच वर्षांची मुले लहान इंग्रजी वाक्ये सहज वाचतात.
गणित शिकविण्याच्या पद्धतीत डॉट कार्डचा उपयोग केला जातो. यात ही मुलांना १, २, ३, ४ असे सिंबॉल्स न दाखविता पांढऱ्या कार्डावर लाल रंगाचे ठिपके दाखवून अंक पक्के करून घेतले जातात. यामुळे बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार विद्यार्थ्यांना पटकन करता येते. या पद्धतीमुळे एकदा शिकविलेली गोष्ट मुले आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीत. मुलांना ‘ए’ फॉर ‘अ‍ॅपल’ असे न शिकविता सफरचंद हातात दिले जाते. मुले ते पाहतात, हातात घेऊन चाचपडतात. त्याचा वास घ्यायला मुलांना सांगितले जाते. नंतर त्यांना ते खायला दिले जाते. शेवटी त्याला ‘अ‍ॅपल’ म्हणायला लावले जाते. यामुळे स्पर्श, डोळे, नाक, चीभ आणि कान अशा सर्व इंद्रियांना अ‍ॅपलची ओळख न होईल तरच नवल. रोज एक याप्रमाणे फळे, फुले, भाजीपाला, फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ, धान्य, कडधान्य, तांदळाचे प्रकार, डाळी, उपलब्ध औषधी वनस्पती आदी याच पद्धतीने शिकविले जातात. यामुळे मुले शिक्षकांनी एखाद्या पदार्थाच्या खाण्याची नक्कल जरी केली तरी तो पदार्थ ओळखतात.
मुलांना डोळ्यापर पट्टी बांधून नाक, कान, जीभ, त्वचा, स्पर्श या पंचज्ञानेंद्रियांची शक्ती वाढविण्याचा प्रयत्न शाळा करते. मुलांचे सहावे ज्ञानेंद्रिय यामुळे विकसित होत असल्याने मुले निसर्गाने दिलेले संदेश ग्रहण करू शकतात.
मुलांना डोळ्यावर पट्टी बांधून धातू, दगड, नैसर्गिक फरशांचे तुकडे, मिश्रणापासून बनविलेले टाईल्स, झाडांची पाने, वेगवेगळ्या कापडांचे तुकडे, कागदाचे, लाकडाचे तुकडे आदी वस्तूंना स्पर्श करायला सांगितला जातो व त्या वस्तूचे नाव सांगितले जाते. अशा प्रकारे वास असणारे पदार्थ, उत्पादने, मसाल्याचे पदार्थ, डाळी, कच्च्या पालेभाज्या, फळे, झाडाची पाने यांचा वास घ्यायला लावून पदार्थाची ओळख करून दिली जाते. तसेच जिभेला वेगवेगळ्या चवींची जाणीव करून दिली जाते. डोळे बंद करून मुलांना वेगवेगळे आवाज ऐकविले जातात व आवाजाची ओळख करून दिली जाते. सध्या मुलांची सर्वसामान्य व्यक्तींना ऐकू न येणाऱ्या दूरवरील निसर्गातील विविध आवाज ऐकण्याची क्षमता तयार झाली आहे. एखादा सूप प्यायला दिल्यानंतर त्यामध्ये कुठल्या पदार्थाचे मिश्रण आहे हे मुले चव घेतल्यानंतर सांगतात.
शास्त्राप्रमाणे वयाच्या आठ वर्षांपर्यंत जर हाताच्या बोटांचा विशिष्ट पद्धतीने व्यायाम झाला तरच ती व्यक्ती पुढे सर्जनशील बनू शकते अथवा बोटांनी करावयाच्या तत्सम तांत्रिक गोष्टी सक्षमपणे हाताळू शकते. या शाळेत अशा प्रकारच्या बोटांच्या व्यायामासाठी शैक्षणिक खेळण्याच्या साहित्याबरोबरच चिमटीने धान्य वेचणे, त्यांची मांडणी करणे, दोऱ्यामध्ये मणी ओवणे आदी व्यायाम करून घेतले जातात. मुलांची संगीतात रुची व ज्ञान वाढविण्यासाठी सिंथेसायझर हे वाद्य शिकविले जाते. त्यामुळे बोटांचा व्यायामही होतो. सध्या दोन मुले सिंथेसायझर हे वाद्य सहजतेने हाताळू शकतात.
‘एनस्कायलोपीडिया नॉलेज’ या उपक्रमाअंतर्गत मुलांना जगातील जास्तीत जास्त माहिती फ्लॅश कार्डच्या साहाय्याने करून दिली जाते. यात सध्या मुले वेगवेगळ्या देशाचे झेंडे, नकाशे, प्राणी, पक्षी, वाहने, फुले, फळे, सिम्बॉल, नेते, ऐतिहासिक वास्तू आदी तब्बल ६००हून अधिक संज्ञा ओळखू शकतात. शाळेत शिक्षक एक तास आधी मेडिटेशन करून मगच वर्गात येतात. शिक्षकांचे प्रयत्न आणि अध्ययन-अध्यापनाचे नावीन्यपूर्ण तंत्र यामुळे शाळा जिल्ह्य़ांमध्ये ‘जादुई शाळा’ म्हणून ओळखली जाते.
तबस्सुम अस्लम मुलाणी
विशेष शिक्षिका,
मिरॅकल्स प्री प्रायमरी स्कूल,
खरडी, पंढरपूर
संपर्क- ९६३७२९२०७०.