सेट-नेट, पीएच.डी., एम.फिल. तसेच परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मुंबई विद्यापीठातर्फे देऊ केलेली श्रेणी सुधार योजना अखेर वर्षांनुवर्षे वंचित असलेल्या ‘एलएलएम’च्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आली आहे. एलएलएमला ही योजना लागू नसल्याने या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.
अपेक्षित गुण न मिळाल्यास विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची पुनर्परीक्षा देऊन श्रेणी सुधारता येते. ही योजना सर्व अभ्यासक्रमांना लागू आहे. परंतु सुरुवातीपासूनच एलएलएम या विषयाला अपवाद करण्यात आल्याने गेली अनेक वर्षे या विषयाचे विद्यार्थी या योजनेपासून वंचित होते. सेट-नेट, पीएच.डी. तसेच परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो. राज्यातील इतर सर्व विद्यापीठात एलएलएमला ही योजना लागू आहे. मग मुंबई विद्यापीठच त्याला अपवाद का, असा सवाल करत ‘प्रहार’ विद्यार्थी संघटनेने एलएलएमच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यावर २५ ऑगस्टला झालेल्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत निर्णय घेत विद्यापीठाने ही योजना एलएलएमच्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विधी शाखेच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अधिष्ठाता अशोक येंदे यांनी सांगितले. शनिवारी होणाऱ्या विद्वत सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. पीएच.डी.करिता किमान ५५ टक्के गुणांची अट आहे. आजारपण किंवा अन्य कारणांमुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे, असे सांगत ‘प्रहार’चे  सरचिटणीस अजय तापकीर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.