महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च २०१३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षांसाठी पाठय़पुस्तकात कोणताही बदल होणार नसल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. हा निर्णय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान) या विषयांना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या विषयांच्या अभ्यासक्रमातही बदल होणार नाही, असेही मंडळाने म्हटले आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मार्गदर्शनानुसार ११ वी व १२ वी या इयत्तांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या विषयांचे अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आले होते. या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ११ वीसाठी २०११-१२ या शैक्षणिक वर्षांपासून, तर १२ वीसाठी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात आली होती, मात्र अनेक शिक्षकांनी हे अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाले नसल्याचे सांगितले होते.
शिक्षकांनी वेळापत्रकाचे नियोजन केल्यास अभ्यासक्रम पूर्ण शिकवून होण्यास काहीच अडचण येणार नाही. गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर आवश्यकता असल्यास त्याबाबत २०१३-१४ या वर्षांसाठी सुधारणा करण्यात येतील, असे मंडळाने सांगितले. विशेष म्हणजे, यंदाच्या उच्च माध्यमिक परीक्षा या सुधारित अभ्यासक्रमानुसारच होतील, असा निर्णय मंडळाने घेतला आहे.