राज्यातील विद्यार्थी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना आता महिन्यातून एकदाच रजा घेऊन घरी जाता येणार आहे. विद्यार्थी वसतिगृहांसाठी शासनाने नियमावली तयार केली असून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. राज्यातील निवासी वेदपाठशाळा, वारकरी शाळा, खासगी शिक्षणसंस्थांची वसतिगृहं या सर्वानाच येऊ घातलेली नवी नियमावली बंधनकारक राहणार आहे.
राज्यात आदिवासी वसतिगृहे, समाजकल्याण किंवा शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत नोंदणी झालेल्या निवासी शाळा आणि वसतिगृहे याशिवायही अनेक खासगी विद्यार्थी वसतिगृहे चालवली जातात. या वसतिगृहांसाठी नियमावली करण्यात येत असून त्याचे प्रारूप शासनाने जाहीर केले आहे.
१८ वर्षांखालील मुलांसाठी चालवली जाणारी जी वसतिगृहे शिक्षण, समाजकल्याण किंवा इतर कोणत्याही विभागाच्या अखत्यारित नोंदवली गेलेली नाहीत, त्यांना हे नियम लागू करण्याचे महिला आणि बालकल्याण विभागाच्या विचाराधीन आहे. यामध्ये निवासी वेदपाठशाळा, वारकरी शाळा, खासगी शिक्षणसंस्थांची वसतिगृहे, स्वतंत्र व्यवसाय म्हणून चालवली जाणारी वसतीगृहे यांचा समावेश आहे. या नियमावलीनुसार वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता महिन्यातून एकच रजा मिळणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना महिन्याला साधारण तीन रजा मिळत असत. मात्र, या नव्या आराखडय़ानुसार आता या रजा कमी होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रवेश कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांने शैक्षणिक वर्षांतील सर्व परीक्षांना हजर राहणे आवश्यक राहणार आहे.