विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी केंद्रातर्फे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तसेच उच्च माध्यमिक स्तरावर व्यवसाय शिक्षण योजना महाराष्ट्रातील ३५० शासकीय शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव श्रीनिवास शास्त्री यांनी दिली.

संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्रातच सर्वाधिक शाळांमध्ये ही योजना उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना करून द्यायला हवा, अशी सूचनाही शास्त्री यांनी केली. येथे के. के. वाघ शिक्षण संस्थेत व्यवसाय शिक्षण योजनेविषयी कार्यशाळा घेण्यात आली. संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्याच्या दृष्टीने आयोजित या कार्यशाळेत शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानचे सहसंचालक राजेंद्र शहाडे यांनी शाळांच्या बांधकामविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण योजनेसंबंधी माहिती दिली. द्वितीय सत्रात उपस्थित अधिकारी आणि मुख्याध्यापकांना योजना राबविण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस नाशिक विभागातील सुमारे १५० मान्यवर उपस्थित होते. के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी हे उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित होते. प्रा. योगिता भामरे यांनी सूत्रसंचालन केले.