विद्यापीठ अनुदान आयोगाने रॅगिंगचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. तरी रॅगिंगचे प्रमाण कमी झाले नसून थेट तक्रारी करण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. विशेष म्हणजे ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’नेच (यूजीसी) एका स्वतंत्र संस्थेकडून हा अभ्यास करून घेतला आहे.

देशभरातील सुमारे ३७ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे सुमारे ४० टक्के मुलांना रॅगिंगचा सामना करावाच लागतो. ज्यांच्यावर रॅगिंग केले जाते अशा विद्यार्थ्यांपैकी केवळ ८.६ टक्के विद्यार्थीच तक्रारी दाखल करतात, तर अनेक विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंग ‘एन्जॉय’ केले असे सांगितले. रॅगिंगच्या काही प्रकरणांत विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे तसेच शिक्षणालाच रामराम ठोकला असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वेळोवेळी अनेक तक्रारी व आंदोलनेही झाली आहेत. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईही केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेत कठोर भूमिका घेण्याचे आदेश ‘यूजीसी’ला दिले आहेत. ‘यूजीसी’नेही रॅगिंग होत असल्यास तात्काळ कळविण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक जाहीर केला असला तरी अशा घटनांची तात्काळ माहिती तसेच संबंधितांवरील कारवाईचे अहवाल ‘यूजीसी’च्या वेबसाइटवर टाकण्यात येताना दिसत नाहीत, असे काही ज्येष्ठ प्राध्यापकांनी सांगितले. प्रत्येक विद्यापीठामध्येही रॅगिंगविरोधी समिती स्थापन करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांकडून थेट तक्रार येईपर्यंत बहुतेक ठिकाणी अध्यापक वर्ग ‘रॅगिंग’ रोखण्यासाठी फारसा पुढाकार घेतना दिसत नाही. यूजीसीने नेमलेल्या अभ्यास समितीत प्राध्यापक मोहन राव, डॉ. शोभना सोनपर, डॉ. अमित सेन, प्राध्यापक शेखर शेषाद्री आणि दिव्या पडालिया यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या समितीने दिलेल्या अहवालात विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आठ टक्के रॅगिंग हे जातीवर आधारित तर २५ टक्के रॅगिंगचे प्रकार हे भाषा व प्रांतवार होतात. उत्तर प्रदेशात त्यातही तेथील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त असून ३२ टक्के  विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंग एन्जॉय केल्याचे म्हटले आहे. साठ टक्के विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार रॅगिंगनंतर वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून आपल्याला मदतही करण्यात आली. रॅगिंगमुळे अभ्यासावर परिणाम झाल्याचे पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे असून चार टक्के प्रकरणांत लैंगिक ‘रॅगिंग’ झाल्याचे दिसून आले आहे. ‘रॅिगग’मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असेही मत काही विद्यार्थी व्यक्त करतात, तर आपण अनुभवलेले ‘रॅगिंग’ ज्युनियर्सनीही अनुभवले पाहिजे असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. तथापि ‘रॅगिंग’ बंद झाले पाहिजे असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्के आहे.