‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत माहिती भरताना शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांना ४२०चे कलम लावण्यासंदर्भातील विधान संबंधित परिपत्रकातून वगळण्याचा निर्णय घेत शिक्षण विभागाने अखेर माघार घेतली आहे.
सरलची माहिती भरताना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे परिपत्रक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना आले होते. त्यात विद्यार्थ्यांची अथवा शाळेची माहिती भरताना चूक झाल्यास भारतीय दंड विधान संहितेतील कलम ४२० अन्वये कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला होता. अनेक मुख्याध्यापकांच्या संघटनेने आक्षेप घेतला होता. त्याला प्रतिसाद देत सरकारने हे कलम वगळले आहे.
यापुढे शिक्षण विभागाने प्रत्येक परिपत्रक काढताना शब्दरचना तपासून घ्यावी; जेणेकरून कुणाचाही अपमान होणार नाही, अशी प्रतिक्रिया यासंबंधात शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिली.