शिक्षक, जि. प. प्राथ. शाळा वनोटे, ता. मुरबाड, जि. ठाणे. मोबाइल- ८८०५०८५५९६.
सह्य़ाद्री पर्वताच्या अगदीच कुशीत वसलेलं मुरबाड तालुक्यातील वनोटे हे जेमतेम २०० लोकवस्ती असलेलं छोटंसं खेडेगाव. खेडेगाव कसलं, पाडाच तो! आदिवासी कातकरी समाजातील १५-२० कुटुंबं या गावात राहतात. दिवाळीचा सण झाला की ही कुटुंबं आपल्या मुला-बाळांसह कल्याण परिसरात वीटभट्टीच्या कामानिमित्त स्थलांतरित होतात. त्यांचं हे स्थलांतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडसर बनतं. ही मुलं शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी येथील शाळेच्या शिक्षकांनी गावकऱ्यांचं कृतिशील योगदान घेत.. शाळेचं रूप बदललं.. या मुलांचं स्थलांतर थांबवलं. या शाळेच्या वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांनी या मुलांना शाळेचा इतका लळा लावला की, ती मुलं आपल्या आई-बाबांबरोबर स्थलांतरित न होता आपल्या नातेवाईकांकडेच राहू लागली..
मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी व त्यांना टिकवून ठेवण्यासाठी गेल्या पाच-सात वर्षांपासून अविरत धडपड येथे सुरू आहे. चौथीपर्यंतच्या या शाळेने लोकसहभागातून शाळेचं रूप कसं बदलू शकतं हे आपल्या कृतिशील योगदानातून दाखवून दिलं आहे. ग्रामीण आदिवासी मुलांना शिक्षणात आनंद वाटावा म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचं येथील शिक्षकांनी ठरविलं. ज्या गावकऱ्यांनी, पालकांनी शाळेची पायरीही कधी चढली नव्हती, त्यांना शिक्षणाचं आणि संगणकाचं महत्त्व पटवून देण्यात शिक्षक यशस्वी झाले. मग काय, लोकांनी रोजीरोटीच्या उत्पन्नातून काही रक्कम शाळेला संगणक खरेदीसाठी देण्याचं सर्वानी मान्य केलं आणि बघता बघता संगणकासाठीची रक्कम जमा झाली. शाळेत संगणक आला. संगणकाशी मुलांची केवळ ओळखच नाही, तर दाट परिचय झाला.
शिक्षकांनी कॅमेरा, मोबाइल यांचा कल्पकतेने वापर करीत मुलांच्या अनेक कृती संगणकात सेव्ह केल्या. चौथीपर्यंतची मुलं तासभर संगणकावर बसून काहीतरी शोधतात. एकमेकांशी चर्चा करतात. एवढंच नाही तर शिक्षकांनी गेल्या वर्षी एज्युकेशनल सॉफ्टवेअरचा वापर सुरू केलाय. त्यावर मुलं स्वयंअध्ययनाने शिकतात. शिकताना खूप मजा येते, असंही ही चिमुकली नमूद करतात. आजच्या घडीला ते खूप काही शिकलेत असं नाही, पण संगणक त्यांच्या शिकण्यातील आनंद द्विगुणित करतो, ही बाब समाधानाची आहे. लाजरी-बुजरी मुलं संगणकावर नाव टाइप करतात, शैक्षणिक खेळ खेळतात, हा त्यांच्यातील आत्मविश्वास थक्क करणारा आहे.

स्थानिक कलाकार, कारागीर यांचीही मदत वेळोवेळी अध्यापनात घेतली जाते. गावातील वेतकाम करणाऱ्या कारागिरांच्या मदतीने व सहकार्याने मुलांना वेतकामाचं प्रात्यक्षिक दाखविण्यात आलं. मुलांनीही आपलं कौशल्य दाखवत छान वस्तू (टोपल्या, परडय़ा, शोभेच्या वस्तू) तयार केल्या. अशाच प्रकारे सुतार, गवंडी, कुंभार यांच्या कामासंबंधीची ओळख करून देण्यासाठी अध्ययन अनुभवांची योजना शालेय वेळापत्रकात करण्यात आली. विद्यार्थी, पालक व स्थानिक कारागीर यांच्या मदतीने व कृतिशील योगदानाने शाळेस छानसं बांबूंचं कंपाउंड तयार केलं. या उपक्रमातून श्रमप्रतिष्ठेचे संस्कार नकळत होत गेले.
मुलांचे वाढदिवस नावीन्यपूर्ण रीतीने साजरे केले जातात. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनाही वाढदिवसाच्या वेळी शाळेत बोलावलं जातं. या वेळी इतर मुलांना खाऊऐवजी लेखन साहित्य, तसंच शालेय साहित्याचं वाटप केलं जातं. मुलांचा शब्दसंग्रह वाढावा, त्यांना आपल्या भावना मोकळेपणाने, योग्य शब्दांत व्यक्त करता याव्यात, यासाठी भाषाविकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. प्रसंगी बोलीभाषेचा वापर कल्पकतेने केला जातो.
मुलांच्या सर्जनशीलतेचा विकास व्हावा म्हणून हस्तकला, मातीकाम, चिकटकाम, चित्रकला अशा अनेक कलाप्रकारांतून व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन वेगळेपण जपणारं असतं. महाराष्ट्राची संस्कृती, लोककलाप्रकार यांचा समावेश या कार्यक्रमांमध्ये असतो. सण-उत्सवांमध्ये शाळेचा सहभाग असतो. गावातील गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला, रमजान ईद हे सण शाळा व गाव एकत्र येऊन साजरे करतात. शारीरिक क्षमता विकसनासाठी योगासनं, मैदानी खेळ, प्राणायाम, यांचेही धडे दिले जातात.
परिसर सहलींमधून मुलं लघुउद्योग, बँक, पोस्ट ऑफिस, सहकारी संस्थांना भेटी देऊन माहिती संकलित करतात. वर्तमानपत्रांचा कल्पकतेने अध्यापनात वापर येथे केला जातो. मुलांचं अनुभवविश्व संपन्न करणारे विविध विषयांवरील चित्रपट मुलांना दाखविले जातात. तालुका पातळीवरील विविध स्पर्धामध्ये मुलं उल्लेखनीय यश संपदान करतात.
शाळेच्या वरील वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांमुळे ग्रामीण आदिवासी भागातील मुलांचं केवळ स्थलांतर थांबलं असं नाही तर ती शिक्षणप्रवाहात सामील होऊन आत्मविश्वासाने शिकू लागली. मुलांची उपस्थिती वाढली. शाळेविषयी त्यांना आदर वाटू लागला. पालक दूरगावी कामानिमित्त जाऊनही मुलांना या चार भिंतीतील आनंददायी वातावरणाने मोहून टाकलं. विशेष बाब म्हणजे शाळेतील संगणकावर एज्युकेशनल सॉफ्टवेअरचा अध्यापनात वापर होऊ लागल्याने मुलं स्वत: संगणकावर काम करीत, शिकत शिकत आनंदाने पुढे जाऊ लागली. पालकांमध्येही एक प्रकारचा सकारात्मक वैचारिक बदल झाला. एका छोटय़ाशा वाडीतील शिक्षणाचा दिवा तेवत राहावा म्हणून सेवा सहयोग या संस्थेने मुलांना आणखी एक संगणक व स्कूल किट दिलं. येथील मुलांचं शिकणं अधिक सुकर झालं आहे.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com