‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे ऑक्टोबर-सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून या दोन्ही परीक्षांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. दहावीचा निकाल २९.२५ टक्के तर बारावीचा २६.७७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो अनुक्रमे १७.८५ आणि २१.७५ टक्के असा होता.
यंदा १,३५,९१६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९,७५१ विद्यार्थी उत्र्तीर्ण झाले आहेत. तर बारावीची परीक्षा ९३,५१० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २५,०२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मंडळाच्या  संकेतस्थळावर हा निकाल दुपारी १ पासून उपलब्ध झाला. दहावीचा कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे २२.४८ टक्के लागला आहे. त्या खालोखाल मुंबईचा २५.८८ टक्के आहे. सर्वात जास्त निकाल औरंगाबाद (३३.१५) आहे. बारावीचा पुणे विभागाचा निकाल २२.७६ टक्के आहे.  औरंगाबाद (३५.४३ टक्के) विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. गुणपत्रिकांचे वाटप ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ४ ते १५ डिसेंबरदरम्यान अर्ज करायचा आहे. तर छायाप्रतीसाठी २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान अर्ज करायचा आहे. ज्यांना पुनर्मूल्यांकन करायचे आहे त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असणार आहे.

दहावीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्याने शाळांकडून आता विलंब शुल्क घेतले जाणार नाही. मात्र, अर्ज भरण्याची मुदत आधी जाहीर केल्याप्रमाणेच असणार आहे.