दहावी-बारावीच्या निकालांच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसून या संदर्भात सोशल मिडियाच्या फिरणाऱ्या अफवांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असा खुलासा मुंबईतील ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या विभागीय कार्यालयाने केला आहे. निकालाचे काम सुरू असून तारखांचा अंदाज २० मेनंतरच येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात सर्वसाधारणपणे बारावीचा निकाल जाहीर होतो. तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर केला जातो. परंतु, ‘जोपर्यंत निकालाचे काम आवाक्यात येत नाही, तोपर्यंत तारखा जाहीर केल्या जात नाहीत. दरवर्षी साधारणपणे आठवडाभर आधी निकालाची तारीख मंडळातर्फे जाहीर करण्याची प्रथा आहे. यंदाही आम्ही त्यानुसार तारखा जाहीर करू,’ असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. गेले दोन आठवडे सोशल मिडियाच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या तारखांबाबतचे लघुसंदेश फिरत आहेत. परंतु, या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.