बीड जिल्ह्य़ातील नामांकित शाळांमध्ये माजलगावचे ‘सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय’ ओळखले जाते. अंबाजोगाई येथे काही ध्येयनिष्ठ शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘भारतीय शिक्षण प्रसारक संस्थे’च्या या शाळेने विविध उपक्रमांबरोबरच गुणवत्तेतही आपले उच्चतम स्थान अबाधित राखले आहे. अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमुळे ही शाळा विद्यार्थ्यांच्या ‘आनंदा’चे  ठिकाण बनले आहे.

समृद्ध व देखण्या अशा इमारतीत १९६६पासून शाळा कार्यरत आहेत. शाळेत दैनंदिन अध्यापनासोबत भरपूर उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचे नियोजन विद्यासभा करते. सर्व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक विकास साधून त्यांची आदर्श भारतीय म्हणून ओळख निर्माण करणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यासभा या कामात मोलाची कामगिरी बजावते. विद्यासभेअंतर्गत अभ्यासपूरक मंडळ कार्यरत असून दरवर्षी नियोजनबद्धरीत्या कार्यक्रम-उपक्रम राबविले जातात. अभ्यासपूरक मंडळप्रमुख म्हणून दरवर्षी एका ज्येष्ठ शिक्षकाची निवड केली जाते. हे प्रमुख इतर सहकाऱ्यांमार्फत उपक्रम राबवितात. ही मंडळे पुढीलप्रमाणे-
ज्ञानोपासक मंडळ – विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करणे ही या मंडळाची जबाबदारी आहे. थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानात सहभागी होण्याचे प्रोत्साहन या मंडळामार्फत विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांना वक्तृत्व संपन्न करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
संस्कार मंडळ – विद्यार्थ्यांमध्ये आदर्श संस्कारांची रुजवणूक होऊन त्यांना सत्शील, चारित्र्यसंपन्न व गुणवान बनविणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर संपन्न भारतीय संस्कृतीची जोपासना, संवर्धन व्हावे या उद्देशाने रक्षाबंधन, मकरसंक्रांती, संस्कृत दिन आदी कार्यक्रमांचे आयोजन हे मंडळ करते.
कलोपासक मंडळ – विद्यार्थ्यांचा कलेच्या अंगाने विकास व्हावा यासाठी नाटय़ाभिनय, अभिरूप नाटय़ीकरण, रांगोळी स्पर्धा, एकपात्री अभिनय आदी कलाप्रकारांबाबत हे मंडळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते.
बलोपासक मंडळ – विद्यार्थी निरोगी, बलदंड, सुदृढ व्हावा म्हणून सकाळच्या प्रार्थनासभेत प्राणायाम, योगासने विद्यालयाच्या प्रांगणात घेतली जातात. या शिवाय दहीहंडी, स्वच्छता अभियानाची जबाबदारी हे मंडळ सांभाळते.
विज्ञान मंडळ – वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हे मंडळ कार्य करते. सर्पमित्राची मुलाखत, औद्योगिक परिसर भेट, मकर संक्रमणाच्या दिवशी भूगोलविषयक व्याख्यान आदी उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात. या मंडळांबरोबरच शाळेची इतरही काही वैशिष्टय़े आहेत. ‘अभ्यासक्रम नियोजन पुस्तिके’मार्फत प्रत्येक इयत्तेचे मासवार नियोजन केले जाते. ही पुस्तिका शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना दिली जाते. यात प्रत्येक विषयाचे नियोजन असून त्याप्रमाणे अध्ययन-अध्यापन केले जाते. या शिवाय सर्व परीक्षांच्या तारखा पुस्तिकेत असतात. मासिक पद्यही पाठांतर उपक्रम म्हणून दिलेले असते.
एनटीएस, एमटीएसच्या धर्तीवर शाळा बीटीएस (भारतीय टॅलेन्ट सर्च) ही स्पर्धा परीक्षा घेते. या परीक्षेचा अभ्यासक्रम संस्थेचा असून त्याप्रमाणे मार्गदर्शक पुस्तक तयार करण्यात आले आहे. तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेच्या तयारीसाठी शाळा भरण्यापूर्वी जादा तासाचे आयोजन केले जाते. अन्य शाळेत शिकणारी मुलेही ही परीक्षा देऊ शकतात.
दरवर्षी साधारणपणे १ जुलैपासून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी जादा तासांचे आयोजन केले जाते. रोज दोन तासांच्या या कालावधीत सर्व विषयांचे अध्यापन केले जाते. सर्व विद्यार्थ्यांना जादा तासांना हजेरी लावणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी वाचन करता येत नाही, अशांसाठी दर शनिवारी उपचारात्मक वर्गाचे आयोजन केले जाते. या विद्यार्थ्यांना वाचन-लेखन शिकविले जाते. गणितातील पायाभूत संकल्पना शिकविल्या जातात. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना न्यूनगंड दूर करण्यास मदत झाली आहे. दररोज सकाळी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा झाल्यानंतर मासिक पद्य गायिले जाते. त्यानंतर परिपाठात दिनविशेष, बातम्या, बोधकथा, सुविचार आदींचे सादरीकरण विद्यार्थी करतात. प्रत्येक शुक्रवारी इंग्रजी तर मंगळवारी संस्कृत परिपाठ असतो. गुरुवारी हिंदी भाषेत परिपाठ होतो. दर शनिवारी भारताच्या संविधानाचे सामूहिक वाचन होते. मंगळवार, शुक्रवार व गुरुवारी विद्यार्थी-शिक्षक एकमेकांशी त्या त्या नियोजित भाषेत संवाद साधतात.
‘भारतीय सण-नवा अन्वयार्थ’ या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून नवा संदेश देण्याचा प्रयत्न असतो. एके वर्षी शाळेच्या मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांसहित आरोपींना राख्या बांधल्या. नागपंचमीला सर्पमित्राचे प्रात्यक्षिक आयोजित करून साप मानवाचा मित्र आहे, हा संदेश देण्यात आला. मुलांमधील नेतृत्व गुणांच्या विकासासाठी दरवर्षी जुलैमध्येच वर्गप्रतिनिधी मंडळ निवडले जाते. या मंडळाचे एक दिवसाचे नेतृत्व गुण विकास शिबीर गावाभोवतालच्या एखाद्या निसर्गरम्य स्थळी आयोजित केले जाते. या शिबिरात परिसरातील मान्यवर व्यक्तींना बोलावून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते
 या शिवाय गणवेश वाटप, पूरग्रस्तांना अन्नवाटप आदी सामाजिक बांधीलकी जपणारे उपक्रम शाळा करत असते. माजी विद्यार्थी संघटन, शिक्षक-पालक संघ, शैक्षणिक सहली, शिक्षक-पालक संपर्क अभियान या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा पालक, माजी विद्यार्थ्यांसमवेतचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करते. शाळेचे ग्रंथालय, संगणक कक्ष सुसज्ज आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेने स्वत:चे आकर्षक घोषपथक तयार केले आहे. सकाळच्या प्रार्थनासभेत हे घोषपथक सहभागी होते. दरवर्षी स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या हस्तलिखित वार्षिक अंकांचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते केले जाते. यात ‘चित्रमंजिरी’ हा चित्रकलेला वाहिलेला अंक असतो, तर ‘आविष्कार’ या अंकात विद्यार्थी लेखकांचे साहित्य असते. शाळेने या वर्षी संगीत विषयाला वाहिलेल्या अंकाचेदेखील प्रकाशन केले. दैनंदिन अध्यापन-अध्ययनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धुमारे फुटून त्यांना संपन्न बनविणारे हे उपक्रम शाळेचे वैशिष्टय़ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आनंदाची अनेक ठिकाणे निर्माण करण्यात शाळेला यश आले आहे. आनंददायी शिक्षणाचा हा अनुभव विद्यार्थ्यांसमवेत आम्ही शिक्षकांनाही तितक्यात उत्कटतेने अनुभवत आहोत. यापेक्षा समाधानाची बाब ती कोणती?

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com