येत्या २३ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने त्या समारंभासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी नाराज झाले. सर्वसामान्यपणे पदवी समारंभाचे नवल सर्वानाच असते. मात्र मध्येच शिक्षण सोडून कधी तरी शिक्षणाची संधी मिळवायची आणि काम करून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पदवी समारंभाचे खास अप्रूप असते. म्हणूनच पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहण्याचे एसएमएस  विद्यापीठाच्यावतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आल्यापासून काही विद्यार्थ्यांनी नाशिक येथे विद्यापीठात पदवीप्रदान समारंभात हजेरी लावण्यासाठी तयारी चालवली होती.मात्र, मुक्त विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ रद्द झाल्याचे समजताक्षणी ते नाराज झाले. नागपूर विभागातून ९,१६७ विद्यार्थ्यांनी यावर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
बीएचे सर्वात जास्त ४,०८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बी.कॉम.चे ६१८, बीए(पोलीस प्रशासन) ४४२, कृषी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम २४५विद्यार्थी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम-२०८, बी.एड. २८५, बी.कॉम.(मराठी)- ३९७, डिप्लोमा इन हॉल्टिकल्चर-२४४, डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन-२०७, डिप्लोमा इन फ्लोरीकल्चर अ‍ॅण्ड लँडस्केप गार्डनिंग-१९३, आग आणि सुरक्षा अभियांत्रिकी व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम-१२३, शाळा व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम- १,२८१, भाजी उत्पादन पदविका अभ्यासक्रम-१८९ आणि एमबीए-२७२ एवढय़ा विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शनिवारचा पदवी प्रदान समारंभच रद्द झाल्याने आता विद्यार्थ्यांना आरक्षण रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. पदवी प्रदान समारंभाची पुढील तारीख कळेपर्यंत विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे.