शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांच्या डोकेदुखीला कारणीभूत ठरलेल्या ‘सरल’ या उपक्रमात उद्भवणाऱ्या विविध अडचणींचा पाढा आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वाचण्यात आला आहे. शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘सरल’मुळे शाळांमध्ये अध्ययनाची प्रक्रिया अक्षरश: थांबल्याची तक्रार केल्याने त्यांनी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याकडून या संदर्भात माहिती मागविली आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगटापासून ते त्यांच्या आईवडिलांच्या उत्पन्नापर्यंतची माहिती संगणक प्रणालीमार्फत ‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत संगणकावर भरण्यात येत आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वी या योजनेला शालेय शिक्षण विभागाने सुरुवात केली. परंतु, अध्यापनाबरोबरच दहावीच्या फेरपरीक्षांचे आयोजन, नैदानिक चाचणी अशी कितीतरी कामे असताना ‘सरल’चेही काम शिक्षकांकडे आल्याने गेले दीड महिना शाळांमध्ये शिकविण्याचे काम बंद झाले आहे. शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, कार्यवाह सुभाष मोरे, जालिंदर सरोदे यांनी मंत्रालयात भेट घेऊन हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील, आमदार तुकाराम काते उपस्थित होते. यात एका विद्यार्थ्यांची तब्बल ८० प्रकारची माहिती भरावी लागते. अनेकदा त्यासाठी पुरेसे संगणक उपलब्ध होत नाहीत. नेटवर्क मिळत नाही. गेले काही दिवस तर संगणक प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने तासन्तास प्रयत्न करूनही माहिती भरता येत नाही. तसेच, यात शिक्षकांचे कामाचे तास मोडत असल्याने हे काम स्वतंत्र यंत्रणेमार्फत वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करवून घेण्यात यावे, अशी मागणी आहे.

सहा महिनेही पूरणार नाहीत
या अडचणींमुळे महिनाभरात दोन कोटी विद्यार्थ्यांपैकी केवळ १५ लाख विद्यार्थ्यांचीच माहिती भरून झाली आहे. माहिती भरण्यासाठीची मुदत १५ ऑगस्टला संपणार आहे. ही मुदत वाढविण्यात येणार असल्याचे संकेत विभागाकडून देण्यात येत आहेत. मात्र, याच वेगाने काम सुरू राहिले तर आणखी सहा महिने तरी हे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे, शिक्षकांना या कामाला जुंपण्याऐवजी माहिती भरणाऱ्या संस्थेकडे ते सोपविण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.