राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या निवृत्तीनिमित्त राज्यातील शिक्षकांना दानशूर होण्याचा आग्रह शिक्षक संघटनांनी धरला आहे. विविध संघटनांनी मिळून संचालकांचा जंगी निरोप समांरभ आयोजित केला असून संचालकांच्या निवृत्तीनिमित्त दुष्काळग्रस्त भागाला एक दिवसाचा पगार देण्याचा आदेशच संघटनेच्या शिक्षक सदस्यांना देण्यात आला आहे.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना कायम सळो की पळो करून सोडणाऱ्या शिक्षक संघटना त्यांच्या निरोप समारंभासाठी एकत्र आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने आता निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त शिक्षक संघटनांनी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले आहे. आजपर्यंत कोणत्याही संचालकांचा झाला नाही असा जंगी सोहळा होणार आहे. तोही साधारण साडेआठशे आसन क्षमता असलेल्या पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात हा समारंभ होणार आहे. येत्या शुक्रवारी (२९ एप्रिल) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शैक्षणिक विषयांवर परिषद घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्नेहभोजन, सत्कार अशा रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाचा भार संघटनांनी स्वेच्छेने उचलला आहे. मात्र, ही ‘स्व-इच्छा’ पूर्ण करण्यासाठी काही संघटनांनी शिक्षकांकडे निधीची मागणी केल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. त्याचबरोबर यावेळी संचालकांच्या निवृत्तीचे औचित्य साधून दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी संघटनेतील शिक्षक एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसाठी देणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात येते आहे.
याबाबत काही शिक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आमचा मुळातच एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे. तरीही पुन्हा एक दिवसाचा पगार देण्याची मागणी आमच्याकडे करण्यात येत आहे. संघटनांशी बांधिलकी असल्यामुळे यासाठी नकारही देता येत नाही. आजपर्यंत कोणत्याच संचालकांचा अशाप्रकारे निरोप समारंभ झाला नाही.’
याबाबत माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

‘प्राथमिक शिक्षण संचालकांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने दुष्काळग्रस्त भागाला मदत म्हणून शिक्षक आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत. विविध शिक्षक संघटना एकत्र येऊन हा समारंभ करत आहेत. त्याचा खर्चही संघटना विभागून घेणार आहेत. माने साहेबांनीच मोठा कार्यक्रम करण्यासाठी नकार दिला आहे.’
– प्रसाद पाटील, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना