केवळ आठवीपर्यंत नव्हे तर पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत हवे यासाठी शिक्षक, पालक आणि शाळाचालक यांच्या संयुक्त मोर्चाचे आयोजन शनिवारी (२ फेब्रुवारील) दादर येथे करण्यात आले आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात शिक्षक, पालक आणि शाळाचालकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘शिक्षण हक्क कृती समिती’च्या नेतृत्त्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी ३ वाजता दादरच्या गडकरी चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. पुढे नर्दुला टँकपर्यंत मोर्चा नेण्यात येईल.
शेतकरी नेते राजू शेट्टी, समितीचे अध्यक्ष प. म. राऊत, निमंत्रक अमोल ढमढेरे आदी मान्यवर या मोर्चात सहभागी होतील. तर आमदार कपिल पाटील मोर्चाचे नेतृत्त्व करतील. या शिवाय फादर ग्रेगरी लोबो, डॉ. झहीर काझी, गिरीश सामंत, मनजितसिंग भट्टी, रामचंद्र आदावळे, आर. बी. रसाळ, कमलाकर सुभेदार, अतुल देशमुख, नवनाथ गेंड आदी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

कृतीसमितीने केलेल्या मागण्या..
* आठवीपर्यंतच नव्हे तर पदवीपर्यंतच्या शिक्षणाची हमी सरकारने घेऊन ते विद्यार्थ्यांना मोफत  द्यावे.
* शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची पूर्ततेची जबाबदारी सरकारची आहे.  शिक्षक, कर्मचारी व सुविधांचा खर्च सरकारने करावा.
* सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक संस्थांना विनाविलंब १००टक्के अनुदान द्यावे.
* शिक्षकांची कंत्राटी पद्धत बंद करून त्यांचे शोषण थांबवावे. केंद्राप्रमाणे वेतन देऊन निमशिक्षकांना नियमित करावे.
* कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी.
* शिक्षणाचे व्यापारीकरण व कंपनीकरण थांबवावे
* मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा त्वरित करावा.
* झोपडपट्टय़ांमधील मान्यताप्राप्त शाळांच्या जमिनी त्या त्या शिक्षण संस्थांच्या नावे करून द्याव्या.
* संस्थांना वेतनेतर अनुदान व इमारत भाडे मागील थकबाकीसह विनाविलंब द्यावे
* खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे.