लाखो रुपयांचे शुल्क बुडीत खात्यात

सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिल्लक असलेल्या जागांवर थेट प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे लाखो रुपयांचे शुल्क बुडीत खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत. या विद्यार्थ्यांनी याआधी ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला होता त्या महाविद्यालयांनी शुल्क परत देण्यास नकार दिल्याने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटच्या घटकेला केलेल्या बदलाचा हा फटका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकी प्रवेशाच्या सर्व फेऱ्या पार पडल्यानंतर १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र १४ ऑगस्ट रोजी दुपारी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘सरकारी महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार असून या महाविद्यालयांमध्ये जाऊन थेट प्रवेश घ्यावा’ अशी सूचना लघू संदेशाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. या लघू संदेशानुसार अनेक पालकांनी सरकारी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधून प्रवेश अर्ज केला. ही प्रक्रिया १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपये भरून प्रवेशनिश्चिती केली. यानंतर मंगळवारी जेव्हा विद्यार्थी व पालक याआधी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश रद्द करण्यासाठी गेल्यावर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश रद्द करू, मात्र शुल्क परतावा केवळ एक टक्काच करण्यात येईल असे सांगितले. याला पालकांनी विरोध केला. मात्र हे मान्य केल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत असे सांगितल्यावर पालकांनी महाविद्यालयाची अट मान्य करीत कागदपत्रे पदरी पाडून सरकारी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केला. आता यानंतर आम्हाला आमचे पैसे मिळणार का, असा प्रश्न पालकांसमोर आहे. हा प्रकार राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये होत असल्याने शेकडो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या लघू संदेशानंतर शशिकांत हवनूर या पालकांनी व्हीजेटीआय महाविद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला. यानंतर मंगळवारी जेव्हा ते के. जे. सोमय्या महाविद्यालयात गेले तेव्हा त्यांना प्रवेश रद्द करून कागदपत्र देण्याचे सांगितले. मात्र दीड लाख रुपये परत देता येणार नसल्याचे सांगत केवळ दीड हजार परत केल्याचे हवनूर यांनी सांगितले. व्हीजेटीआयमध्ये प्रवेश घेण्याची घाई असल्यामुळे सोमय्या महाविद्यालयाची अट मान्य करीत कागदपत्रे मिळवली. मात्र आम्हाला आमचे शुल्क परत मिळावे अशी त्यांची मागणी आहे. याच वेळी सोमय्या महाविद्यालयात आलेल्या आणखी दहा पालकांचीही सारखीच समस्या होती असेही हवनूर यांनी स्पष्ट केले. तर संचालनालयाच्या नियमांनुसार महाविद्यालयाने १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश रद्द करणाऱ्यांना नियमांनुसार थोडी रक्कम कापून शुल्क परतावा केला. मंगळवारी प्रवेश रद्द झाला तर ती जागा रिक्त राहणार असल्यामुळे महाविद्यालयांसमोर त्या जागेचे पैसे कोण देणार, असा प्रश्न असल्याचे महाविद्यालय प्रशासनांचे म्हणणे आहे. या संदर्भात सरकार जे आदेश देईल त्याचे आम्ही पालन करू असेही महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ज्या पालकांना महाविद्यालयांकडून अशा प्रकारची अडचण येत आहे त्या पालकांनी विभागाच्या सहसंचालकांशी संपर्क साधावा असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी स्पष्ट केले.