‘व्हीजेटीआय’चे आंतरमहाविद्यालयीन फेस्टीवल
अंधांच्या मार्गातील अडथळे ओळखणारा ‘ब्लाईंड नेव्हीगेशन’, आग विझविण्यास आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास मदत करणारा रोबो, रेल्वेरूळावरील अपघात रोखण्यास मदत करणारी ‘रेल्वे रिव्हॅम्प’ योजना यंदाच्या ‘टेक्नॉव्हॅन्झा’ या आंतर महाविद्यालयीन तंत्रज्ञान महोत्सवाची आकर्षणे असणार आहेत.
माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’चा हा बहुचर्चित तंत्रज्ञान महोत्सव ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची यंदाची थीम आहे ‘चेंजिंग डायमेन्शन’. समाजापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. गेल्या वर्षीच्या टेक्नोव्हॅन्झामध्ये तब्बल २३ हजार व्यक्तींनी या ना त्या कारणाने सहभाग घेतला होता. तर सुमारे १५ हजार विद्यार्थी, कॉपरेरेट्स वेगवेगळ्या स्पर्धा, प्रदर्शने, कार्यशाळा, व्याख्यान, परिसंवाद आदींच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
याही वर्षी अनेक समाजोपयोगी तांत्रिक प्रकल्पांची मांडणी या महोत्सवात करण्यात येणार असल्याचे ‘व्हीजेटीआय’च्या हर्षांली तळाळे हिने सांगितले. परळच्या फिनिक्स आणि कांदिवलीच्या ग्रोव्हेल मॉलमधून तंत्रज्ञानावर आधारलेले खेळ, सादरीकरण करून करून व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी ‘टेक्नोव्हॅन्झा’साठी वातावरण निर्मितीला सुरूवात केली आहेच. रुबिक्स क्यूब आर्टच्या सहाय्याने साकारण्यात आलेली रतन टाटा यांची प्रतिमा, स्नूकर खेळणारा रोबो, वॉल-ई, मास्टर ऑफ पपेट्स आदींच्या माध्यमातून आपल्या महोत्सवाविषयी सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचा ‘व्हीजेटीआयन्स’चा प्रयत्न आहे.
महोत्सवात ‘प्रतिज्ञा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना मुंबईच्या समस्यांवर नावीन्यपूर्ण व व्यवहार्य तोडगा सुचविण्याची संधी देणारा ‘मिशन मुंबई’ हा उपक्रम यावेळच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ असणार आहे.
महोत्सव काळात कारखानदारीतील भारताचे स्पर्धात्मकता या विषयावर परिसंवादाचे  आयोजन करण्यात आले आहे.
या क्षेत्रातील नामवंत उद्योजकांना ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळेल. त्याचबरोबर रोबो वॉर, कोडिंगवर आधारलेली ‘अल्टिमेट कोडर’ ही आव्हानात्मक स्पर्धा, शोधनिबंधांचे सादरीकरण, इमारत बांधकामावर आधारित ‘बीड टू बिल्ड’, आयसी इंजिन गाडय़ांची ‘स्पिट सेकंड’ स्पर्धा, तंत्रज्ञान कंपन्यांच्या  प्रश्नांवर उपाय सुचविणारी ‘आयक्यूब’ आदी स्पर्धा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजिण्यात आल्या आहेत. या स्पर्धामधून एक लाख रूपयांपर्यंतची बक्षीसे मिळविता येतील.