राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी व्हच्र्युअल रूम तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना वैद्यकीय शिक्षण विभागाने आखली आहे. राज्यातील चौदा महाविद्यालयांमध्ये व्हच्र्युअल रूम तयार करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना दिल्या आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात विनोद तावडे यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगरे व संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते. व्हच्र्युअल क्लासरूम या सुसज्ज करताना त्याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना कसा मिळेल ते पाहण्यास तावडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी वायफाय सुविधा, डिजिटल लायब्ररी, ई-लायब्ररी अशा योजनाही हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये फॅकल्टी एक्सचेंज सुरू करणे, यंत्रसामग्री व औषध खरेदीसाठी नवीन महामंडळ स्थापन करणे, आयुर्वेद व युनानी रसशाळेचे महामंडळात रूपांतर करणे, परावैद्यक व शुश्रूषा शिक्षणाचे विनियमन करण्यासाठी महाराष्ट्र  राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची स्थापना यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तथापि शासकीय वैद्यकीय शिक्षण जागतिक दर्जाचे असले पाहिजे यासाठी अत्याधुनिकीकरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.