‘तृतीय वर्ष कला शाखे’च्या (टीवायबीए) दोन-दोन महिने रडतखडत चालणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांकरिता डोकेदुखी ठरू लागल्या असून परीक्षांच्या या फेऱ्यातून सुटका करण्याची मागणी विद्यार्थ्यांमध्ये जोर धरू लागली आहे. कहर म्हणजे या वर्षी टीवायबीएच्या काही विषयांची परीक्षा पुढील सत्र सुरू झाल्यानंतरही चालणार आहे. त्यामुळे परीक्षा द्यायची की पुढील सत्राच्या वर्गाना हजेरी लावायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर ठाकला आहे.
टीवायबीएच्या पाचव्या सत्राची परीक्षा २३ ऑक्टोबर, २०१५ला सुरू झाली. ती जवळपास जानेवारी, २०१६ पर्यंत चालणार आहे. परंतु काही विषयांचे सहापैकी तीन पेपर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात, तर उरलेले ३ डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात असल्याने परीक्षा दोन-दोन महिने चालणार आहे. उदाहरणार्थ राज्यशास्त्र विषयाचे तीन पेपर ३, ४, आणि ५ नोव्हेंबरला होणार आहेत. तर उरलेले तीन पेपरची परीक्षा २७, २८ आणि २९ डिसेंबरला आहे. दरम्यानच्या काळात म्हणजे १५ नोव्हेंबरला दुसरे सत्र सुरू होणार आहे. थोडक्यात, विद्यार्थ्यांनी एका बाजूला दुसऱ्या सत्राच्या वर्गाना उपस्थिती लावायची आणि आधीच्या सत्रातील विषयांचा अभ्यास करून परीक्षाही द्यायची. सत्र परीक्षा व्यवस्था ही विद्यार्थ्यांवर एकाच परीक्षेमुळे येणारा ताण कमी करण्यासाठी म्हणून आणण्यात आली होती, परंतु या दोन्ही कसरतींचा दुहेरी ताण विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. दोन विषय घेऊन परीक्षा देणाऱ्यांबरोबरच सहाही पेपर एकाच विषयातून देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. २०१५च्या सहाव्या सत्राचे तीन पेपर एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात आणि उरलेले ३ जूनच्या पहिल्या आठवडय़ात होते. त्या वेळेस तीन पेपरच्या नंतर एकूण मिळून ४७ दिवसांची गॅप होती. एकाच विषयाच्या परीक्षा अशा दोन-दोन महिने रखडत असल्याने एकाचा परिणाम दुसऱ्यावर होत जातो, पुढे निकालही लांबतो. परीक्षा जूनपर्यंत लांबल्याने पेपर तपासायचे की वर्गावर जाऊन शिकवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला होता.
सत्र परीक्षेने प्रश्न आणखी गंभीर
‘वेळापत्रक बनविताना कमीत कमी दिवसांत परीक्षा कशी संपेल याची खबरदारी विद्यापीठाने घ्यायला हवी. सध्या केवळ अर्थशास्त्र, इंग्रजी हे विषय वगळता राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इतिहास, मानससास्त्र आदी विषयांच्या परीक्षा दोन-दोन महिने रखडत आहेत. आम्ही अनेक वेळा हा गोंधळ विद्यापीठाच्या लक्षात आणून दिला, परंतु कला शाखेला कायमच दुय्यम वागणूक देण्याच्या धोरणातून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे पाचव्या व सहाव्या सत्राची रखडणारी परीक्षा दर वर्षीचीच समस्या बनून गेली आहे. वार्षिक परीक्षा व्यवस्था असतानाही हीच परीस्थिती होती, परंतु सत्र परीक्षा सुरू झाल्यापासून ती आणखी वाईट झाली आहे. कारण, त्या वेळी वर्षांतून किमान एकदाच या प्रश्नाला सामोरे जावे लागायचे. पण वर्षांतून दोन वेळा हा ताण सहन करावा लागतो आहे. सकाळी ११ ते १.३० एवढय़ाच वेळेत परीक्षा असते. त्याऐवजी दिवसभरात दोन सत्रे करून परीक्षा घेतल्या तर किमान ती लवकर तरी उरकेल.
एक प्राध्यापक
फक्त तारखा बदलण्याचे काम
कला शाखेचे विषय अधिक असल्याने त्यांना या गोंधळाचा फटका जास्त बसतो. त्यासाठी परीक्षा मंडळ आणि अधिष्ठातांनी दरवर्षी परीक्षांचा आढावा घेऊन त्यानुसार वेळापत्रक आखले पाहिजे. कुठले विद्यार्थी कुठले विषय घेऊन बसतात, याचा अभ्यास व्हायला हवा. परंतु आपल्याकडे सरधोपटपणे वेळापत्रक आखले जाते. परीक्षा विभाग गेल्या वर्षीच्या तारखा बदलण्याचे काम करते.
संतोष गांगुर्डे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना