वैद्यकीय आणि दंत वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर ५ मे, २०१३ मध्ये होऊ घातलेल्या ‘नॅशनल एन्स्ट्रन्स कम एलिजिबिलीटी टेस्ट’ (नीट) या परीक्षेचे स्वरूप अजुनही पुरेसे स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ कायम आहे.
पदवी अभ्यासक्रमांसाठी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे (सीबीएसई) ही परीक्षा प्रथमच घेतली जाणार आहे. वैद्यकीयसाठी द्याव्या लागणाऱ्या निरनिराळ्या प्रवेश परीक्षांचा बोजा कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकच सामाईक प्रवेश घ्यावी, असा नीटचा आयोजनामागील हेतू आहे. मात्र, परीक्षा तोंडावर आली तरी या परीक्षेत विषयांचे ‘वेटेज’ काय असणार आहे, याचा खुलासा सीबीएसई किंवा ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’नी (एमसीआय) केलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
गेल्या आठवडय़ात सीबीएसईने या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरूवात केली. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार या परीक्षेत अकरावी-बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र मिळून) या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित एकूण १८० प्रश्न नीटमध्ये विचारले जाणार आहेत.
मात्र, या तीन विषयांचे (पीसीबी) वेटेज म्हणजेच कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जाणार हे अद्याप सीबीएसईने स्पष्ट केलेले नाही. परीक्षा जाहीर करताना विषयवार वेटेज स्पष्ट करणेही आवश्यक आहे. मात्र, सीबीएसईने याचा खुलासा न केल्याने कोचिंग क्लासेस मनाला वाटेल ते विषयावर ‘वेटेज’ सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत आहेत.
एमएच-सीईटीसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये २०० प्रश्नांपैकी १०० प्रश्न जीवशास्त्र व उर्वरित १०० प्रश्नांपैकी प्रत्येकी ५० प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर अशी विभागणी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भर जीवशास्त्रावर अधिक असे. पण, नीट संबंधात अशा कोणताच खुलासा करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
काही क्लासचालक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांना प्रत्येकी ६० तर काही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांना प्रत्येकी ४५ प्रश्न असे वेटेज सांगून मोकळे झाले आहेत. पण, जोपर्यंत सीबीएसईकडून या संबंधात अधिकृत खुलासा होत नाही, तोपर्यंत  कुठला फार्मुला खरा मानायचा असा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया ‘सायन्स अकॅडमी’चे सुभाष जोशी यांनी दिली.
चुकीच्या उत्तराला एक गुण वजा
नीटमध्ये एकूण १८० प्रश्न विचारण्यात येणार असून प्रत्येक योग्य उत्तराला चार गुण दिले जाणार आहेत. याप्रमाणे एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा होईल. प्रत्येक प्रश्नाला एक मिनिट याप्रमाणे तीन तासांत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण वजा केला जाईल. नीटमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या ५० टक्के इतके गुण ही प्रवेशासाठीची पात्रता धरली जाईल.