मी ‘हॉटेल मॅनेजमेंट’ केले म्हणून मला स्वयंपाक येतो, असे मी म्हणणार नाही. माझ्या आईने मला लहानपणापासूनच स्वयंपाक करायला लावला, माझे कुठेही अडू नये म्हणून. नूडल्स, ऑम्लेटपासून सुरुवात झाली, ती मग ‘मटन करी’पर्यंत पोहोचली. आई बाहेरगावी गेली की, मी आणि बाबा त्यांच्या मित्रांना घरी बोलावून पाटर्य़ा करायला लागलो. त्यांनी केलेल्या कौतुकाने माझा उत्साह वाढला आणि मी स्वयंपाक करत राहिलो. आई रुग्णालयामध्ये असतानासुद्धा मी, बाबा आणि माझी बहीण स्वयंपाकघर सांभाळायचो. अर्थात हे सगळे हौस, आवड म्हणून चालू राहणार आहे, असे घरच्यांना वाटत होते. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करियर करण्याचे माझ्या मनात येईल, असे त्यांना वाटले नव्हते.

तेव्हा केबल टीव्ही नुकताच चालू झाला होता. झी टीव्हीवरच्या मिशीवाल्या संजीव कपूरचे कुकरी शोज् लागायचे. ते मी आवडीने पाहायचो आणि त्याला फॅन मेल लिहायचो. मला दादरच्या कॅटिरग कॉलेजमध्ये जायचे होते ते संजीव कपूर बनायलाच! आईबाबांसाठी हा धक्काच होता. सहावीत असताना मला हौसेने संगणक घेऊन देणाऱ्या बाबांना; मी कॉलेजसाठी खरेदी केलेला झारा, उलथणे, आयसिंग बॅग्ज् आणि स्पॅटय़ुला पाहून रडू आले होते. मुंबईला होस्टेलला निघाल्यावर आई मला म्हणाली होती, ‘‘का चालला आहेस तू? तू नाही हे काम करणार.’’.. पण मी गेलोच.

मुंबई, हॉस्टेल आणि कॅटिरग कॉलेजने मला बदलले. कॉलेजमध्ये कॉन्टिनेंटल किचन, क्वाँटिटी किचन, अ‍ॅडव्हान्स किचनमध्ये माझ्या स्वयंपाक करण्याला शिस्त लागली. तिथली ‘मेस डय़ुटी’ मला खूप आवडायची. त्यात होस्टेलमध्ये राहणाऱ्या सर्वासाठी आठवडाभर ‘मेस’ चालवायची असायची. सोमवार ते शुक्रवार ब्रेकफास्ट आणि शनिवार-रविवारी सकाळच्या नाश्तासह दुपारचे आणि रात्रीचे जेवणही बनवायचे. मेनू ठरवण्यापासून वाढण्यापर्यंत सगळे आम्हाला करायला लागायचे. ठरावीक बजेटमध्ये सगळ्यात जास्त वैविध्य कोणता ग्रुप देतो याची चुरस असायची. त्या तुटपुंज्या बजेटमध्ये आम्ही पोह्य़ांपासून ‘पातरानी मच्छी’पर्यंत सगळे काही तयार करून खायला घातले.

प्रॅक्टिकलाही खूप मजा यायची. मला स्वयंपाक करताना खाण्याची सवय लागली होती. अजूनही आहे. कापलेला टोमॅटो, कांदा, किसलेले चीज, खोवलेले खोबरे, तळलेले काजू, पाकात टाकण्याआधीचे गुलाबजाम, उकडलेले चिकन.. असे काहीही मी खातो. प्रॅक्टिकलसाठी मिळालेले साहित्यसुद्धा मी खायचो. माझा पार्टनर अब्दुल खान त्यामुळे वैतागून जायचा. आमच्या टेबलवर साहित्याचा ट्रे आला की, मला नैवेद्य दाखवल्यासारखा करून तो म्हणायचा, ‘‘भाई, तू पहले खा. बचा तो फिर प्रॅक्टिकल करते है!’’

केटिरग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लगेचच मला एका पंचतारांकित हॉटेलात ‘किचन मॅनेजमेंट ट्रेनी’ची नोकरी लागली. तिथे कामाला गेलो की मी कधी पूर्ण दिवस कांदे सोलायचो, तर कधी प्रॉन्स, तर कधी चॉकलेट ‘फोडायचो’. कधी एखाद्या डिशसाठी लागणारी फक्त सेलेरी मी स्वच्छ केलेली असायची. कधी नाइट शिफ्टमध्ये पूर्ण आठवडय़ाच्या ‘ग्रेव्हीज्’ बनवून ‘ब्लास्ट फ्रीझ’ करून ठेवायचो. या सगळ्यात स्वयंपाकाचा आनंद कुठेच नव्हता. मी स्वयंपाक करत नसून विकण्यासाठी माल बनवतोय असे मला वाटायचे. एका मोठय़ा असेंब्ली लाइनचा भाग होणे मला आवडले नाही. कदाचित मी माझे मत खूप लवकर बनवले; पण मी नोकरी सोडून पुण्याला आलो. मी पुढे काय करणार आहे, हे मलाही माहिती नव्हते.

एव्हाना केबल टीव्हीचे जाळे पुरेसे पसरून आता प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या होत्या. त्यासाठी कार्यक्रम बनवणारी वेगवेगळी प्रॉडक्शन हाऊसेस सुरू झाली होती. पुण्यात श्रीरंग गोडबोलेंच्या ‘आय.एम.ई.’मध्ये माझा महाविद्यालयातला सीनियर मोहित टाकळकर एडिटर होता. तोही हॉटेल मॅनेजमेंट सोडून इकडे आला होता. मग मीही आय.एम.ई.मध्ये काम करू लागलो. पुढची तीन वर्षे एडिटिंग करण्यात आणि मोहितबरोबर पी.डी.ए.ची नाटके करण्यातच गेली. हॉटेलमधली नोकरी का सोडलीस? असे घरच्यांनी कधी विचारलं नाही, पण एडिटिंग आवडत असेल तर ते नीट शिक, असे मात्र सांगितले. मग मी रीतसर प्रवेश परीक्षा देऊन ‘एफ.टी.आय.आय.’मध्ये प्रवेश मिळवला.

हॉटेल मॅनेजमेंटची वाट सोडली असली तरी पाककलेपासून मी दूर गेलो नव्हतो. चवीने खाणे आणि हौसेने स्वयंपाक करून खायला घालणे सुरूच होते. ‘एफ.टी.आय.आय.’मध्ये आल्यावर आधीच्या ६-७ वर्षांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन मला मिळाला, एडिटिंग करणे आणि स्वयंपाक करणे या दोन्हीत फारसा फरक नाही, असे माझ्या लक्षात आले. मी खूप इन्स्टींक्टीव्ह आहे. फ्रिज घडून बघितल्यावर माझ्या डोक्यात पदार्थ तयार होतो; पण प्रत्यक्षात तो तयार करायला घेतल्यावर त्याचे काही तरी वेगळेही होऊ शकते. एडिटिंगचेही तसेच. रशेस बघून माझा पहिला कट खूप लवकर तयार होतो. मग काही कल्पना मॅरिनेट केल्या जातात आणि काही विचार डीप फ्राय! काही आयडिया नुसत्या सोलल्या की त्यातली अळी दिसते आणि मग मी ती आयडिया  वापरत नाही.

पुण्यात माझी आतेबहीण शुभदा जोशी कुकिंग क्लासेस घ्यायची. एफ.टी.आय.आय.मध्ये शिकत असतानाच मी शुभाताईच्या क्लासमधल्या महिलावर्गाला मांसाहारी पदार्थ करायला शिकवायला लागलो आणि त्या शिकवण्याने काही गोष्टी मीही शिकत गेलो. मी माझ्या अंदाजाने ठरवलेल्या प्रमाणांना आणि उत्स्फूर्तपणे करत असलेल्या पाककृतींना, शुभाताईने टी स्पून्स आणि कप्सची शिस्त लावली. मला एकच पदार्थ पुन:पुन्हा, त्याच चवीचा तयार करता यायला लागला. शुभाताईबरोबर मी पुण्यातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जायचो. तिथले खास पदार्थ मागवून ते कसे केले असतील ते लिहून काढायचो. शेफचे कामाचे तास संपेपर्यंत स्टाफ गेटपाशी वाट पाहून शेफकडून पाककृती घ्यायचो आणि प्रयोग करायचो. शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बऱ्यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच मी एफ.टी.आय.आय.ची दुसऱ्या वर्षांची फी भरली. एकीकडे एडिटिंगचा अभ्यासही चालूच होता. चित्रपट महोत्सव, मास्टर क्लास, स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावायचो. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करायचो आणि प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचो. एकुणात स्वयंपाक आणि एडिटिंग दोन्हीचाही जाणतेपणाने आनंद घ्यायला लागलो होतो.

२००६ मध्ये, डॉक्युमेंटरी सिनेमा शिकायला पॅरिसला जायची स्कॉलरशिप मिळाली. जाताना आईने, ‘असू देत’ म्हणून लसूण-खोबऱ्याची चटणी बरोबर दिली होती. त्या चटणीने माझ्या पॅरिसमधील वास्तव्यात धमाल उडवून दिली. आधुनिक चित्रपट आणि आधुनिक पाककला या दोन्हीचेही माहेरघर असणाऱ्या पॅरिसमध्ये मी चांगलाच रमलो. ‘Larousse Grastronomique’ सारख्या पुस्तकांमध्ये ज्यांची फक्त नावं वाचली होती ते पदार्थ इथे रस्त्यावर मिळत होते. आठवडय़ातील तीन दिवस माझ्या रूममध्ये पार्टी असायची. ११ वेगवेगळ्या देशांतून आलेल्या ११ जणांचा आमचा वर्ग या पार्टीत सामील असायचा. माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी आईने दिलेली लसूण चटणी वापरायचो. माझ्या क्लासमेट्सनी त्याला L’ épice magical असे नाव दिले होते. मेक्सिकन गाजपाचो, मोरॉक्कन, कुस् कुस्, व्हिएटनामियन् नूडल्स.. सगळ्यात मी L’ épice magical वापरून अनेक मित्रमैत्रिणी जोडले.

सचिन कुंडलकर ‘रेस्टॉरंट’ सिनेमाचा रफ कट घेऊन पॅरिसला आला होता.  La Fémis च्या एका स्क्रीनिंग थिएटरमध्ये आम्ही दोघांनीच बसून तो चित्रपट पाहिला. मग भरपूर क्रीम आणि चीज घालून मशरूम सॉस बनवला आणि तो स्टेकबरोबर खाल्ला. मी पॅरिसहून परत आलो तेव्हा माझे वजन दहा किलोने वाढले होते! एफ.टी.आय.आय. संपवून मी कामासाठी मुंबईत आलो तेव्हा चार मित्रांबरोबर घर शेअर करत होतो. आम्ही राहणारे चार असलो तरी कुठल्याही दिवशी घरात ७-८ जण असायचेच. सगळे स्ट्रगलर्स. आठवडय़ातून तीन-चार वेळा आमची पार्टी असायची. तेव्हा ‘फिंगर फूड’ आणि ‘मेन कोर्स’ची जबाबदारी माझ्याकडे यायची. मला पॅरिसमध्ये सापडलेल्या क्रीम सॉसचे मी या काळात खूप प्रयोग केले. ‘मशरूम इन क्रीम सॉस’, ‘सॉसेजेस विथ क्रीम अ‍ॅन्ड गार्लिक डिप’, इतकेच काय ‘चिकन करी’सुद्धा क्रीममध्ये करायचो. मी केलेले ‘क्रीम चिकन’ खायला अगदी मीरा रोड आणि बोरीबंदरहूनही मित्रमंडळी यायची. त्या काळात क्रीम बटर, चीज आणि तूप यांच्याशिवाय मी स्वयंपाक करायचोच नाही.

मुंबईत काम वाढले तसा मी मुंबईत रमलो आणि ‘बॅचलर फेज्’ही यथावकाश संपली. रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी पत्नी स्मिताने उचलली; पण मी स्वयंपाकघरापासून लांब गेलो नाही. मी पूर्वी घरातूनच काम करायचो. स्मिता सकाळी आठ वाजता कामाला गेली की रात्री आठ वाजेपर्यंत घरी कोणीच नसायचं. माझे दिग्दर्शक मित्र घरी यायचे आणि आम्ही पूर्ण स्वयंपाक करत रोज एडिटिंग करायचो. ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे एडिटिंग पूर्ण स्वयंपाकघरातच झाले. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल महाजन हा ‘करी एक्स्पर्ट’ आहे. ‘सीन्स डिस्कस्’ करत आम्ही जेवणासाठी मॅरिनेशन तयार करायचो आणि मॅरिनेशनच्या काळात सीन एडिटिंग व्हायचे. दुपारचा स्वयंपाक हा एडिटिंगचा हाय पॉइंटचा असायचा. दोन-तीन आठवडय़ांनी हे सगळे वेगवेगळे खाऊन केलेले एडिट स्मिता बघायची आणि कमेंट करायची.

सचिन कुंडलकरबरोबर काम करताना तर ‘हायपरसिटी’मध्ये जाऊन सामान खरेदी करण्यापासून सुरुवात असते. ‘आहे ते बघू आणि त्याचेच करू’ हे त्याच्या चित्रपटासारखेच त्याला जेवणातही चालत नाही. मी स्वयंपाक करताना माझ्यामागे तो ओटा आवरत फिरतो. चित्रपटाचासुद्धा रफ कट होईपर्यंत त्याला धीर नसतो. पंधरा दिवसांनी ये असे सांगितले की, तो त्याच संध्याकाळी येतो.

उमेश कुलकर्णीबरोबरही मी खात आणि खाण्यावर चर्चा करत ‘देऊळ’चं एडिटिंग झालं. खूप काळ चित्रपट बनवणे कसे कठीण आहे आणि आपण कसे रेस्टॉरंट काढले पाहिजे यावर स्प्राऊटस् खात चर्चा रंगायची. परेश मोकाशीची एक वेगळीच तऱ्हा आहे. अतिशय नियमित आणि नियोजित काम तो करतो. काम करत असताना तो कधीही खात नाही, फक्त पाणी पितो. शिवाय तो ‘व्हीगन’ आहे. त्याच्याबरोबर असताना आपण खाण्याला अवास्तव महत्त्व देतोय का? असा प्रश्न मला पडतो. चांगले काम करायचे असेल तर चांगले खावे लागते, हा माझा समज त्याच्यामुळे मी पडताळून पहायला लागलो आहे.

अतुल आणि गीतांजली कुलकर्णी त्यांच्या ‘तानसा’ बंगल्यावर दर पावसाळ्यात एक ‘गेट टुगेदर’ करतात. अनेक अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि कलाक्षेत्रातील मंडळी त्या ‘गेट टुगेदर’ला असतात. तीन-चार दिवस हा ‘एक्स्चेंज प्रोग्राम’ चालू असतो. सचिनने माझ्या पाककलेचे थोडे जास्तच कौतुक केल्याने एकदा अतुलने मलाही त्या गॅदिरगला बोलावले. अतुलचा आमंत्रणाचा फोन आला तेव्हा मला वाटले की, त्याची निर्मिती असलेला ‘राजवाडे अ‍ॅन्ड सन्स’ मी एडिट करतोय म्हणून मला बोलावलेय, एक टीम मेंबर म्हणून; पण जेव्हा त्याने स्वयंपाकाची जबाबदारी मला दिली तेव्हा थोडा थबकून मी माझ्या ‘आयडेंटिटी’चा विचार करायला लागलो. मला जाणवले की, संकलन किंवा एडिटिंग ही काही मूलभूत कला नाही. कोणा एकाने लिहिलेली कोणा एकाने पाहिलेली कथा, लोकांना सांगायला मी फक्त मदत करतो. मी मूळ कथाकार नाही; पण पाककलेचे  तसे नाही. प्रत्येक पाककृती ही पूर्णत: माझी असते. अगदी प्रत्येक वेळी! मग मला माझी ही आयडेंटिटीसुद्धा मान्य झाली. एस्स, आय एम ट्रेंड शेफ! त्या दिवशी मी आणि सचिन भरपूर सामान खरेदी करून संध्याकाळी ‘तानसा’ला पोहोचलो. गप्पांची मैफल सुरू झाली होती. जेवणाला दोन तास अवकाश होता. आम्ही तयारीला सुरुवात केली. व्हेज व नॉनव्हेज थाय करी आणि अ‍ॅपल पाय असा बेत होता. आम्ही भाज्या चिरायला सुरुवात केली आणि बाहेर गप्पा मारणाऱ्या २२ जणांपैकी १०-१२ जण अचानक स्वयंपाकघरात शिरले. आमच्या तयारीत जवळजवळ घुसलेच. मग सगळे चिरायला, वाटायला, निवडायला आणि काय काय करायला लागले. वेगवेगळ्या सूचना येऊ लागल्या. अमितोष नागपालने गाणी म्हणायला सुरुवात केली आणि मग गाणी म्हणत ती थाय करी आणि अ‍ॅपल पाय तयार झाले. जेवणाचा आणि गप्पांचा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालला. सर्वानी जेवणाचे तोंड भरून कौतुक केले. मेघना घाटगे तर माझा हात किस करत म्हणाली, ‘‘चिअर्स टू द शेफ.’’ दोन वर्षांनी अमितोषने एक चित्रपट बनवला. त्याच्या एडिटिंगला मला आवर्जून बोलावले. म्हणाला, ‘‘पहली बार मिले थे तो जबरदस्त खाना बनाया था. अब पिच्चर बनाते है!’’

माझा कामाचा व्याप आता बराच वाढला आहे. आता स्वयंपाकघरात रमत, खात-पित काम करण्याचे टाळतो. माझ्या नव्या स्टुडिओत मी किचन ठेवलेलेच नाही, कारण काम सगळ्यांबरोबर करता येते; पण ज्यांच्याबरोबर स्वयंपाक करता येतो, असे मित्र कमी. माझ्या खाद्यप्रेमाकडे आणि पाककलेच्या हौशीकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी आणखी एक निमित्त घडले ते २-३ वर्षांपूर्वी मधुमेहाचं निदान झालं तेव्हा. मी काय बनवतो, काय खातो याची जाणीव मला स्मिताने तेव्हा करून दिली. बटर, चीज, मसाले, मांसाहारी पदार्थ, सॅलड, पोळी, भात या सगळ्याकडे मी कार्बस्, फॅटस् प्रोटिन्स म्हणून पाहू लागलो.

ऋ जुता दिवेकरांचे लेख वाचू लागलो. सुसाट सायकल चालवायला लागलो. भरपूर पोहायला लागलो आणि जाणीवपूर्वक जीवनशैली बदलू लागलो; पण त्याच वेळी नेट फ्लिक्सवर ‘शेफ्स टेबल’चे एपिसोड्स बघणंही चालूच राहिलं. अर्थात खाणं-खिलवलणेही चालूच आहे, पण एका नव्या जाणिवेनिशी..

अभिजित देशपांडे

abhijeetdesh@gmail.com