सुटसुटीत आणि पोटभरीचे असे सँडविच जबरदस्त लोकप्रिय आहेत. यात शंकाच नाही. किटी पार्टीपासून बोर्डरूममधल्या बैठकांपर्यंत सँडविच चालू शकते. जेवायला वेळ नाही, काम करायचेय किंवा गप्पा मारायच्यात अशा वेळी सँडविच परफेक्ट पर्याय! शिवाय शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीत उपलब्ध! कॅडबरी सँडविच, नटिला सँडविच, बोर्नविटा सँडविच, (उगम सुज्ञांनी जाणला असेलच) हे कमी म्हणून की काय मॅगी सँडविच प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. वेगवेगळे मसाले घालून मॅगी शिजवून त्यात उकडलेला बटाटा घालून तिखट चिली सॉस मारून मॅगी सँडविच पण भन्नाट खपते. आता फक्त उपासाचे सँडविच यायचे राहिलेय.. येईल म्हणा तेही..

कुठल्याही गोष्टीचे पुरेपूर देशीकरण कसे करायचे यामध्ये आपण भारतीय आघाडीवर आहोत. अनेक परदेशी पदार्थाचे आपण इतके मस्त ‘भारतीयीकरण’ केलेय की विचारता सोय नाही. उदाहरण हवंय.. शेजवान डोसा, चीज उत्तप्पा, व्हेज फ्राइड राइसमध्ये सुका मेवा, शेजवान फ्राइड राइस ज्यादा तीखा मारके, तंदुरी पिझ्झा, चायनीज समोसा, शेजवान ढोकळा, आलू टिकी बर्गर (मॅकडोनाल्ड काकांनी इथूनच उचललाय) पनीर फ्रँकी, पनीर पास्ता यादी लय मोठी आहे आणि झालेय असे की आपल्याला किंबहुना आपल्या जिभेला या पदार्थाची एवढी सवय झालीय की त्यांचे मूळ अस्सल रूप पचनी पडत नाही. म्हणून बँकॉक आणि आणि चीनला गेलेले बरेच जण ‘शी काय फालतू चायनीज मिळते तिकडे.. आपल्यासारखे नाही. हा शेरा मारतातच मारतात (हे म्हणजे अस्सल इरसाल मालवण्याला तिबेटी माणसाने माशाबद्दल शिकवण देणे झाले) थोडक्यात, आपल्या भारत भूमीमध्ये जागतिक पदार्थाची आपण देशी आवृत्ती तयार करतो. (अर्थात वावगे काही नाही म्हणा त्यात) भाषा जेवढी वापरावी तेवढी समृद्ध होते म्हणतात तसाच प्रकार आहे हा..

bhuvan bam comments on prathamesh parab recent video
प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
Phulala Sugandh Maticha fame actress aditi deshpande will play role in Lagnachi Bedi marathi serial
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

पण आपण भारतीय लोकांनी एका पदार्थाचे जेवढे देशी अवतार केलेले आहेत. तेवढे मात्र अन्य कुठल्याही पदार्थाचे केले नसतील. सँडविच म्हणजे एखादी विदेशी गौरकांती मार्गारेट इथे यावी आणि कालौघात इथली मंगला व्हावी अशी. मूळचे अगदी विदेशी आणि सौम्य सँडविच आपण कायच्या काय पालटवून टाकलेय. पावाच्या दोन तुकडय़ांमध्ये मांस भरून उभ्या उभ्या किंवा घाईच्या वेळी खाण्याचा प्रकार हे सँडविचचे अगदी सोपे वर्णन करता येईल. लॉर्ड /अर्ल ऑफ सँडविचने हा प्रकार शोधला असे प्रचलित आहे. १७ व्या शतकात याचा उद्भव झाला असे मानले जात असले तरी, हा पदार्थ त्याच्याही आधी (ख्रिस्तपूर्व पहिले शतक) अस्तित्वात होता असे आढळून आलेय आणि तो चक्क ज्यू समाजात प्रचलित होता. काही सणावेळी खास ज्यू प्रकारच्या पावात (मॅटझो) सुका मेवा, फळे इत्यादी भरून खाल्ले जायचे. त्यामागचा इतिहास वेगळा आहे. प्राचीन इजिप्त साम्राज्यात ज्यूंना जो अपरिमित छळ सोसावा लागला त्याची आठवण म्हणून हा पदार्थ खाल्ला जायचा (आपल्याकडे गुढीपाडव्याला कडुिलब चटणी खाल्ली जाते. तसेच) त्यानंतर पुढे वेगवेगळ्या देशात अशा प्रकारे पावात काही तरी सारण घालून खाल्ले जाण्याचा प्रघात जो चालू झाला तो आजही प्रचलित आहे. आणि हे आपले अर्ल ऑफ सँडविच यांच्या बरेच आधी.

एडवर्ड गीबन.. ‘रोमन साम्राज्याचा उदयास्त’ या ग्रंथराजाचा लेखक, त्यानेही सँडविचचा उल्लेख केलेला आहे. अभिजन आणि खानदानी राजकारणी सँडविच खात, असे त्याने नमूद केलेले आहे. अधिकृतरीत्या सँडविचचा झालेला हा प्रथम उल्लेख असे मानायला हरकत नसावी. त्यानंतर १७६२ मध्ये फक्त पुरुषांसाठी असणाऱ्या एका क्लबच्या खानसाम्याने तेथे येणाऱ्या आणि बुद्धिबळ, पत्ते खेळताना तहानभूक विसरणाऱ्या बाप्यांसाठी हा सुटसुटीत पदार्थ देणे सुरू केले. पावामध्ये बीफ स्टेक भरून तो द्यायचा.

आणि यानंतर १७ व्या शतकात आपल्या जॉन मॉटेग्यू साहेबांनी (अर्ल ऑफ सँडविच) खऱ्या अर्थाने या पदार्थाला प्रसिद्धीपटावर आणले असे म्हणायला हरकत नाही. बुद्धिबळ खेळताना जेवणासाठी उठावे लागायचे आणि एकाग्रता भंग पावायची त्यामुळे त्याने खानसाम्याला खारवलेले मांस पावात भरून भाजून द्यायला फर्मावले आणि या प्रकाराला नाव मिळाले सँडविच. साधारणपणे १८ व्या शतकानंतर सँडविच या नावाने जगभर पसरले. म्हणजे अमेरिकेत प्रामुख्याने अमेरिकन पाकशास्त्राच्या पुस्तकामध्ये सँडविचची अधिकृत नोंद झाली.

जगभरात सँडविचचे हजारो प्रकार आहेत. पांढऱ्या पावाच्या तुकडय़ात सारण भरलेले सँडविच हे अगदी प्राथमिक झाले. देशाप्रमाणे हा प्रकार बदललेला दिसून येईल. पावाचे वेगवेगळे प्रकार, आकार, आतील सारण असंख्य पद्धती आहेत. सँडविच आवडण्याचा आणि प्रचंड लोकप्रिय होण्याचे पहिले कारण म्हणजे त्याचा सुटसुटीतपणा.. आणि लवचीकता.. म्हणजे आत काहीही सारण न भरता सँडविच करता येते. नुसत्या सॉस किंवा चटण्या फासून किंवा हौस, वेळ, ऐपत जे काही असेल त्यानुसार नानाविध सारण भरून हे टोलेजंग सँडविच केले जातात. काही चौकोनी, काही गोल, काही लांबुडके, काही त्रिकोणी आकार काहीही असला तरी मूळ घटक पाव.

हा प्रकार अधिकृतरीत्या ब्रिटनमध्ये उगम पावला आणि तेथील अभिजनामध्ये हा हा म्हणता फोफावला. हाय टी (म्हणजे आपला नाश्ता) वेळी पेश करण्यात येणारी सँडविचेस् आणि ते करणारे कुशल आचारी यावरून यजमानांना जोखले जायचे. हाय टी सँडविच म्हणजे अत्यंत मऊसूत, तलम पण लुसलुशीत अशा पावाच्या तुकडय़ावर नजाकतीने पसरलेले क्रीम-चीज, त्यावर काकडीच्या पातळ पारदर्शक चकत्या, चवीला हलकीच मीरपूड. ही सँडविच लांबट तुकडय़ामध्ये कापली जाऊन, चांदीच्या ट्रेमध्ये धवलशुभ्र नॅपकिनवर रचून पेश केली जायची. वाचताना सोपे वाटले तरी करणे फार अवघड आहे. क्रीम-चीज असे पसरायचे की पाव दिसू नये, चीजच्या गुठळ्या नसाव्यात आणि असे तुकडे करायचे की, ते उचलणारी खानदानी बोटं खरकटी होऊ नयेत. गौरवर्णीय लेडीला फार ‘आ’ न वासता नाजूकपणे खाता यावे. या हाय टी पाटर्य़ा आणि ही टी सँडविचेस् तेव्हाच्या लब्धप्रतिष्ठित लोकांसाठी उच्चभ्रू म्हणवले जाण्याचे परिमाण होते.

तर अशा प्रकारे जगभर प्रसिद्ध पावलेले प्रचलित असलेले हे सँडविच आपल्या भारतात आले असावे ते साधारण १९३०च्या सुमारास (हे अगदी सरधोपट अनुमान आहे) तेव्हाच्या खास फिरंग्यांसाठी असणाऱ्या क्लबमध्ये हे सँडविच सर्रास खाल्ले जायचे. विहिरीत पाव टाकून बाटवणे आणि चहामुळे धर्म भ्रष्ट होतो असे मानणाऱ्या तेव्हाच्या कट्टर धर्ममरतडांना आज फक्त सँडविचवर जगणारी तरुण पिढी आणि त्यांच्या जिवावर गब्बर होणारी फूड इंडस्ट्री याची कल्पनादेखील आली नसेल. आपण पाव हा तसा फार आपला मानला नव्हता, त्यामुळे सर्वसाधारण समाजात सँडविच लोकप्रिय व्हायला बराच वेळ जावा लागला. भेळ, पाणीपुरी, इडली, डोसा यांच्या जोडीने सँडविच आले ते साधारण १९८० च्या पुढे आणि नंतरचा इतिहास घडतच गेला..

आजच्या घडीला फक्त सँडविच देणारे हजारो विक्रेते या मुंबईत आढळतील. (हॉटेल, क्लब यांना त्यात धरलेले नाही) सँडविचला संपूर्ण बंबैया बनवण्याचे श्रेय या असंख्य अनामिक कलाकारांकडे आणि त्यानंतर गुर्जर समाजाकडे. उच्चभ्रू सँडविचला सँडविच तीखा मारके बनवण्याचे किंवा हा कायापालट करण्याचे १०० टक्के श्रेय गुजराती खवैयांचे आहे हे मानावेच लागेल. कुठल्याही प्रकाराला आपला खास टच देण्यात हा समाज आघाडीवर असतो. मग ती चीज-पावभाजी असो वा इडली-चिली मंच्युरियन वा चायनीज भेळ, त्या न्यायाने हे सँडविच थेट देशी रूपात आपल्याला मिळाले.

मस्त मोठा चौकोनी किंवा त्रिकोणी पाव, त्यावर दे मार मारला जाणारा मस्का/बटर (हे बटर प्रचलित अमूल बटर नसते. त्याचे फक्त खोके असतात. खास ठेलेवाल्यांसाठी असे स्वस्तात बटर आणि चीज करून देणारे अनेक उद्योग आहेत. त्यांच्याविषयी पुढे कधी तरी) त्यावर चोपडली जाणारी हिरवीगार चटणी आणि नंतर ग्राहकाच्या आवडीनुसार भरला जाणारा मालमसाला यात शेजवान सॉसपासून ते रताळ्यापर्यंत काहीही असू शकते. खोटे वाटत असेल तर घाटकोपर, बोरिवली, विलेपाल्रे (पश्चिम) काळबादेवी, कॉटन एक्स्चेंज अशा ठिकाणी जाऊन खातरजमा करावी. तर त्यावर मस्त प्रेमाने पडणारा चाट मसाला, लाल मिरचीपूड आणि त्यावर भुरभुरली जाणारी बारीक शेव. तो अनामिक भय्या सपसप ही करामत करतो. टोश्ट (बरोबर वाचलेत.. टोश्टच) करून खटखट तुकडे करून झपकन प्लेटमध्ये काढून पेश करतो. सोबत पिचकारीच्या बाटलीतून लाल रंग घातलेला टोमॅटोचा म्हणून दिला जाणारा भोपळ्याचा सॉस!

लय आणि एकाग्रतेने काम करणे याचा आदर्श वस्तुपाठ हवा असेल तर या सँडविचवाल्यांना पाहावे. अनेक ग्राहकांचा घोळका, त्यांच्या फर्माईशी त्या लक्षात ठेवून लांबुडक्या सुरीने सपसप कापण्याचे आणि रचण्याचे कौशल्य, कुणाला कांदा हवा, कुणाला बीट नको, कुणाला आधी कोबी आणि नंतर शिमला मिरची हवी, तर कोणाला चीज नको. बरोब्बर लक्षात ठेवून साहाय्यकांशी नेत्रपल्लवी करत सूचना देत जे काम चालते ते नजर खिळवून ठेवणारे असते. तमाम वर्ककल्चरवाल्यांनी धडे घ्यावेत असे आणि परत प्रत्येक ग्राहकांशी व्यक्तिगत संवाद.. क्या बात है.. हे सँडविच खाणे मग एक मस्त सोहळा होऊन जाते. मग तो भया/सँडविचवाला कॉलेजसमोरचा असो वा नरिमन पॉइंट व्हीटी इथला ऑफिसबाहेरचा..

अनेकदा अस्सलपेक्षा भेसळ भाव खाऊन जाते वा प्रसिद्ध होते हे जे म्हटले जाते ना ते सँडविचच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते. या मुंबईत अनेक असे सँडविचवाले आढळतील. कुणाकडे तशी ऐसपस गाडी आणि मदतनीस असतात तर कुणी एकांडा शिलेदार असतो. शेगडीवर टोस्ट करून सँडविच देणारा. हे जे टोस्टचे लांब उपकरण आहे हेसुद्धा अशाच कुणा देशी डोक्यातून निघालेला खणखणीत भारतीय जुगाड असावा. कशाला हवा लाइटवरचा ग्रिल आणि टोस्टर. म्हणून कोणी तरी ही क्लृप्ती लढवली आणि असंख्य सँडविचवाल्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली.

आपण या विदेशी सँडविचचे पार ‘सेंडवीच’ करून टाकलेय आणि हे रूपसुद्धा तेवढेच अफलातून आहे. सँडविचमध्ये भारतीय जिभेला भावणारी तिखट चटणी आणि चव वाढवणारा चाट मसाला.. हा ज्या कोणी शोधला आहे त्याला तोफांची खणखणीत सलामी! आपण मसाला कुठेही, कसाही आणि कशातही वापरू शकतो. तिखट आणि चटकदार खायला चटावलेली भारतीय जीभच हे असे शोध लावू शकते.

गंमत म्हणजे रोज काही ना काही नवनवीन भर पडत असते. जॅम-ब्रेड आपल्या सर्वाच्या परिचयाचा. त्या जॅम-ब्रेडमधे चॉकलेट सॉस, अननस.. साखर घालून गोड सँडविचपण आणलेय आणि तेही तुफान आवडलेय. कॅडबरी सँडविच, नटीला सँडविच, बोर्नविटा सँडविच, (उगम सुज्ञांनी जाणला असेलच) हे कमी म्हणून की काय मॅगी सँडविच प्रंचड लोकप्रिय झालेले आहे. वेगवेगळे मसाले घालून मॅगी शिजवून त्यात उकडलेला बटाटा घालून तिखट चिली सॉस मारून मॅगी सँडविचपण भन्नाट खपते. आधी नमूद केल्याप्रमाणे रताळे आणि केळे घालूनही सँडविच केले जाते. आता फक्त उपासाचे सँडविच यायचे राहिलेय.. येईल म्हणा तेही..

सातासमुद्रापलीकडे उगम पावलेल्या या विदेशी सँडविचने आपल्याला भुरळ घातलीय हे मात्र सत्य.. कोणी आवड म्हणून तर कोणी गरज म्हणून सँडविच खातेच खाते. अनेकदा त्यामागचे लॉजिकही तमाम आहारतज्ज्ञांना फेफरे आणायला पुरेसे असते. वडे, समोसे, हे तळलेले असतात. सँडविच कसे त्या मानाने हेल्थी! म्हणजे भाज्या (?) पण पोटात जातात.. परत टोस्ट केलेले म्हणजे ताजे.. नाही का? आणि हो सध्या ब्राऊन ब्रेडचे सँडविच फक्त खातो हं.. पांढरा ब्रेड  अगदी वाईट.. बोला काय बिशाद आहे हा युक्तिवाद खोडून काढायची.

हे सँडविच लोकप्रिय का झाले आहे? याचं मुख्य कारण म्हणजे त्याची प्रचंड ताकद. म्हणजे व्यक्तिगणिक फरक करून कस्टमाइज रूपात ते देता येते. प्रत्यक्ष शिजवावे लागत नाही.. म्हणजे तळणे, परतणे काहीही करायची गरज नाही. पूर्वतयारी करून आयत्या वेळेला फक्त एकत्र करायचे एवढेच. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परवडण्यासारखी किंमत. काकडी, कोबी, शिमला अशा कधी कधी महाग असणाऱ्या भाज्यांना पर्याय म्हणून बटाटा, बीट वापरले जाते. चवीनुसार बदल करता येतो. त्यातील विविधता लोकप्रिय झालेली आढळून येतील. आधी उल्लेख केलेले ‘मॅगी सँडविच’ हा त्यातलाच एक भाग. अन्य पदार्थाच्या तुलनेने एका छोटय़ा खोक्यावरसुद्धा सँडविच बनविता येऊ शकते. म्हणजे विक्रेत्यांच्या दृष्टीनेही कमी भांडवल आणि या एवढय़ा सगळ्या गोष्टींमुळे किंमतही तशी माफक ठेवता येते.

काहीही असो.. सँडविच हा सॉलिड प्रकार आहे यावर दुमत नसावे आणि भारतात तर शहरागणिक सोडा, गल्लीगणिक त्याचे रूप पालटते. दिल्लीला त्यात मुळा पडतो. चेन्नईत खोबऱ्याची चटणी, कोलकात्यात चीज तसे कमी वापरले जाते. अहमदाबादेत अनेक वेळेला फक्त बटर आणि चीज पडते. इंदूरला पोह्य़ाचे सँडविच आणि महानगरी मुंबईबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. इथे असंख्य नोकरदारांची लंच टाइममधली भूक भागवायचे काम हे सँडविच करते. अष्टोप्रहर जिवंत आणि पळत असणाऱ्या या शहरातील लाखो काम करणाऱ्यांना या सँडविचने भुकेच्या वेळी आधार दिलेला आहे. वाटले तर उभ्या उभ्या खा किंवा ट्रेनमध्ये किंवा वाहनात!

सुटसुटीत आणि पोटभरीचे असे हे सँडविच जबरदस्त लोकप्रिय आहे, यात शंकाच नाही. किटी पार्टीपासून बोर्डरूममधल्या बैठकांपर्यंत सँडविच चालू शकते. जेवायला वेळ नाही, काम करायचेय किंवा गप्पा मारायच्यात अशा वेळी सँडविच परफेक्ट पर्याय! जगभरात बहुतांशी मांसाहारी सँडविचेस लोकप्रिय आहेत. चिकन, बीफ, हॅम यांच्या अनेकविध भाज्या आणि सॉससोबत जोडय़ा जमवल्या जातात. पाश्चात्त्य सँडविचमध्ये आपल्यासारखी चटणी वापरली जात नाही. मस्टर्ड, मेयॉनीज यावर प्रमुख भर असतो आणि ब्रेडसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा. पांढरा आणि ब्राऊन हे फारच वरवरचे आहेत. त्याव्यतिरिक्त राय, मल्टीग्रेन, ब्लॅक ब्रेड, सोडा ब्रेड, फोकासिया, बार्लीब्रेड अगणित प्रकार. गंमत म्हणजे सध्या लोकप्रिय असणारा पिटा ब्रेड हा सँडविचाच चुलतभाऊ म्हणायला हरकत नसावी. फक्त स्लाइसऐवजी पोकळ गोल असतात.

ग्राहकांगणिक किंबहुना त्याच्या चवीनुसार पालटण्याची अफाट क्षमता असणारा हा पदार्थ दिवसेंदिवस लोकप्रिय होतोय. भले कितीही मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, टॅको बेल्स येउंदे, हाडाचा देशी माणूस मनापासून दाद देतो, तो कोपऱ्यावरच्या ऑफिसखालच्या, कॉलेजसमोरच्या भयाने फटाफट केलेल्या तीखा मारकेवाल्या सँडविचला!

लय आणि एकाग्रतेने काम करणे याचा आदर्श वस्तुपाठ हवा असेल तर या सँडविचवाल्यांना पाहावे. अनेक ग्राहकांचा घोळका, त्यांच्या फर्माईशी त्या लक्षात ठेवून लांबुडक्या सुरीने सपसप कापण्याचे आणि रचण्याचे कौशल्य, कुणाला कांदा हवा, कुणाला बीट नको, कुणाला आधी कोबी आणि नंतर शिमला हवी, तर कोणाला चीज नको. बरोब्बर लक्षात ठेवून साहाय्यकांशी नेत्रपल्लवी करत सूचना देत जे काम चालते ते नजर खिळवून ठेवणारे असते. तमाम वर्ककल्चरवाल्यांनी धडे घ्यावेत असे आणि परत प्रत्येक ग्राहकांशी व्यक्तिगत संवाद.. क्या बात है.. हे सँडविच खाणे मग एक मस्त सोहळा होऊन जाते.

शुभा प्रभू साटम

shubhaprabhusatam@gmail.com